मध्य प्रदेशातून भाजप नेत्यांचे फोन 'टॅप' झाले : देवेंद्र फडणवीसांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 23:57 IST2020-01-24T23:56:04+5:302020-01-24T23:57:39+5:30
आमच्या सरकारच्या कार्यकाळात कोणत्याही राजकीय कार्यकर्त्यांचे किंवा विरोधी पक्षाच्या कुठल्याही नेत्याचे ‘फोन टॅपिंग’चे आदेश दिले नव्हते. उलट निवडणुकांच्या कालावधीत मध्य प्रदेशातूनच भाजप नेत्यांचे फोन ‘टॅप’ झाल्याची माहिती मिळाली असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

मध्य प्रदेशातून भाजप नेत्यांचे फोन 'टॅप' झाले : देवेंद्र फडणवीसांचा आरोप
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आमच्या सरकारच्या कार्यकाळात कोणत्याही राजकीय कार्यकर्त्यांचे किंवा विरोधी पक्षाच्या कुठल्याही नेत्याचे ‘फोन टॅपिंग’चे आदेश दिले नव्हते. उलट निवडणुकांच्या कालावधीत मध्य प्रदेशातूनच भाजप नेत्यांचे फोन ‘टॅप’ झाल्याची माहिती मिळाली असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. नागपुरात ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
निवडणुकांच्या काळात आमचे फोन ‘टॅप’ केले गेल्याची माहिती आहे. यासंदर्भातील तथ्य केंद्र तसेच मध्य प्रदेश सरकार शोधेल. परंतु आम्ही कधीच कुणाचे फोन ‘टॅप’ केले नाहीत. ज्या व्यक्तीने तक्रार केली आहे त्याची विश्वासार्हता सगळ्यांना माहीत आहे, असे फडणवीस म्हणाले.
‘टॅपिंग’संदर्भातील आरोपांची चौकशी व्हावी व त्याचा अहवाल सरकारने जनतेसमोर आणावा. कॉंग्रेस सरकारच्या काळात शिवसेना आणि भाजप नेत्यांचे फोन ‘टॅप’ होत होते व ती बाब बाहेरही आली होती, असेदेखील त्यांनी सांगितले. भीमा कोरेगाव प्रकरणात शहरी नक्षलवादाबाबत ज्या बाबी समोर आल्यात त्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेल्या आहेत व त्यानुसार आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. जाणीवपूर्वक असे वक्तव्य करुन पोलिसांचे मनोधैर्य खच्चीकरणाचे प्रयत्न करण्यात येत आहेत, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले.