महानाट्यातून जीवनचरित्राचे दर्शन
By Admin | Updated: December 22, 2014 00:39 IST2014-12-22T00:39:28+5:302014-12-22T00:39:28+5:30
श्री साईबाबांचे दर्शन घडविणाऱ्या ‘शिर्डी के साईबाबा’ या महानाट्याचा प्रयोग महापालिकेने आयोजित करून त्यांचे जिवंत जीवनचरित्र बघण्याची संधी उपलब्ध केली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय परिवहन

महानाट्यातून जीवनचरित्राचे दर्शन
नितीन गडकरी : ‘शिर्डी के साईबाबा’ महानाट्याचा प्रयोग
नागपूर : श्री साईबाबांचे दर्शन घडविणाऱ्या ‘शिर्डी के साईबाबा’ या महानाट्याचा प्रयोग महापालिकेने आयोजित करून त्यांचे जिवंत जीवनचरित्र बघण्याची संधी उपलब्ध केली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी केले. महापालिकेच्या शतकोत्तर महोत्सवी समारोप निमित्ताने पूर्व नागपुरातील लकडगंज येथील सरदार वल्लभभाई पटेल प्रांगणात आयोजित या महानाट्याच्या प्रयोगाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होेते.
साईबाबांचे दर्शन घडविणाऱ्या या महानाट्यात स्थानिक २५० कलावंत आहेत. त्यांनी मेहनतीने हा प्रयोग केला आहे. यातून लोकांना प्रेरणा मिळेल. साईबाबांच्या आशीर्वादाने नवीन वर्ष सर्वांना सुख, समाधानाचे जावो, अशा शुभेच्छा या निमित्ताने त्यांनी दिल्या. व्यासपीठावर महापौर प्रवीण दटके, उपमहापौर मुन्ना पोकुलवार, आमदार कृ ष्सा खोपडे, सुधाकर कोहळे, आयुक्त श्याम वर्धने, स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर, अपर आयुक्त हेमंतकुमार पवार आदी उपस्थित होते. ज्येष्ठ रंगकर्मी आसावरी तिडके निर्मित व संस्कार मल्टी सर्व्हिसेस द्वारा प्रस्तुत विसाव्या शतकातील थोर संत, जगातील सर्व धर्म, जाती पंथांच्या अनुयायांचे श्रद्धास्थान तसेच सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असलेल्या साईबाबांच्या जीवनकार्यावर आधारित हे हिंदी महानाट्य आहे.
या महानाट्याच्या प्रयोगातून सर्वधर्मसमभाव व एकात्मतेचा संदेश देण्याचा मनपाचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन पोकुलवार यांनी केले. पूर्व नागपुरात सांस्कृतिक कार्यक्रमांना चालना मिळावी या हेतुने महानाट्याचा प्रयोग या भागात आयोजित केल्याचे बाल्या बोरकर यांनी सांगितले. प्रमोद भुसारी यांनी महानाट्याची माहिती दिली. प्रारंभी गडकरी यांनी साईबाबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन केले.
यावेळी शिक्षण समितीच्या सभापती चेतना टांक, क्रीडा समितीचे सभापती हरीश दिकोंडवार, नगरसेवक महेंद्र राऊ त, मनिषा कोठे यांच्यासह या भागातील नगरसेवक, मनपातील अधिकारी उपस्थित होते. महानाट्य बघण्यासाठी साईभक्तांनी गर्दी केली होती.(प्रतिनिधी)
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत समारोप
सोमवारी सायंकाळी या महानाट्य प्रयोगाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील. या सोबतच महापालिकेच्या सुवर्ण महोत्सवाचा समारोप केला जाईल.