समतेचा पाया असणारे तत्त्वज्ञान कधीच मरत नाही
By Admin | Updated: December 14, 2015 03:23 IST2015-12-14T03:23:28+5:302015-12-14T03:23:28+5:30
समता, बंधूभाव व न्याय या विचारांचा पाया असलेले तत्त्वज्ञान कधीच मरत नाही. बाबासाहेबांची चळवळ या तत्त्वज्ञानावर आधारित होती....

समतेचा पाया असणारे तत्त्वज्ञान कधीच मरत नाही
कृष्णा किरवले यांचे मत : एससीएस व्याख्यानमालेचा दुसरा दिवस
नागपूर : समता, बंधूभाव व न्याय या विचारांचा पाया असलेले तत्त्वज्ञान कधीच मरत नाही. बाबासाहेबांची चळवळ या तत्त्वज्ञानावर आधारित होती, असे मत कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख व ज्येष्ठ साहित्यिक प्रा. कृष्णा किरवले यांनी व्यक्त केले. ते एससीएस व्याख्यानमालेत ‘आंबेडकरी तत्त्वज्ञान आणि समकालीन पुरोगामी चळवळी’ विषयावर बोलत होते.
समाजहिताला मारक चळवळींचा नाश केला पाहिजे, असे सूत्र बाबासाहेबांनी मांडले होते. मानव कल्याणासाठी उभारलेल्या चळवळी कधीच फसत नसतात. बाबासाहेबांनी वाताहत झालेल्या लोकांच्या विकासाकरिता चळवळ उभी केली होती. व्यक्ती विकासातून समाज, समाजातून राष्ट्र व राष्ट्र विकासातून विश्व विकास हे तत्त्वज्ञान त्यांनी मांडले होते. असे करताना त्यांनी अज्ञान, अंधश्रद्धा व भावनांना चळवळीतून वजा केले होते. तत्त्वज्ञान व चळवळीला विलग करता येत नाही. त्यांचा संबंध देह व सावलीप्रमाणे आहे. पण काही लोक तत्त्वज्ञानाला विकृत करतात. त्यावर उभ्या राहिलेल्या चळवळींचा बळी जातो. चळवळी करणाऱ्या व्यक्तीने तत्त्वज्ञानावरील निष्ठा सतत जपली पाहिजे, असे किरवले यांनी सांगितले.
चळीवळीमध्ये बहुसंख्य व अल्पसंख्य असा प्रश्न निर्माण होतो. बहुसंख्यांकांच्या चळवळी अल्पसंख्यांकांवर भारी पडतात. अशावेळी अल्पसंख्यांकांनी चार पावले मागे गेल्यास चुकीचे होत नाही. या पराभवातून नवीन शक्ती निर्माण होते. बाबासाहेबांनी चळवळीसंदर्भात अशी भूमिका घेतली होती, याकडे किरवले यांनी लक्ष वेधले.
बाबासाहेबांनी प्राचीन वाङ्मयाचा सखोल अभ्यास केला होता. सर्व वाचल्यावर ते बौद्ध धर्माकडे आकर्षित झाले. त्यांनी डोळे झाकून काहीच केले नाही. त्यांच्याजवळ वैज्ञानिक दृष्टी व मानवतावाद होता. जोसेफ निडहॅम या शास्त्रज्ञानुसार विज्ञान, तंत्रज्ञान व औद्योगिकीकरणाचा प्रसार भारतीय भूमीतून झाला आहे. पहिले वैज्ञानिक गौतम बुद्ध होते. परंतु, आपल्याकडील अभ्यासकांच्या प्रचंड मर्यादा आहेत. त्यांना या सत्य परिस्थितीचा शोध घेता आला नाही, अशी खंत किरवले यांनी व्यक्त केली.संत चोखामेळा समाज मुलींची शिक्षण संस्थेतर्फे पाचपावलीतील एससीएस शाळेच्या प्रांगणात ही तीन दिवसीय व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. व्याख्यानमालेचा आज दुसरा दिवस होता. संस्थेचे अध्यक्ष प्रा. रणजित मेश्राम, उपाध्यक्ष व्ही. टी. चिकटे, एस. डी. सूर्यवंशी, सचिव पवन गजभिये, अधीक्षक प्रा. भाऊ लोखंडे, प्राचार्या मंगला पाटील हे व्यासपीठावर उपस्थित होते. (प्रतिनिधी)