शिष्यवृत्ती घोटाळ्यावर हायकोर्टात याचिका
By Admin | Updated: April 30, 2015 02:27 IST2015-04-30T02:27:41+5:302015-04-30T02:27:41+5:30
दृष्टी बहुउद्देशीय शिक्षण, पर्यटन व पर्यावरण विकास संस्थेचे अध्यक्ष आर.व्ही. रागीट यांनी विदर्भातील शिष्यवृत्ती ...

शिष्यवृत्ती घोटाळ्यावर हायकोर्टात याचिका
नागपूर : दृष्टी बहुउद्देशीय शिक्षण, पर्यटन व पर्यावरण विकास संस्थेचे अध्यक्ष आर.व्ही. रागीट यांनी विदर्भातील शिष्यवृत्ती घोटाळ्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे.
विदर्भातील अनेक शैक्षणिक संस्थांतर्फे वेगवेगळे व्यावसायिक अभ्यासक्रम चालविले जातात. संस्था संचालक शासनाची शिष्यवृत्ती हडपण्यासाठी अभ्यासक्रमांत बोगस विद्यार्थ्यांचे प्रवेश दाखवतात. तसेच, विद्यार्थी अपात्र असतानाही शिष्यवृत्तीसाठी दावे सादर करतात.
संस्था संचालक व शासकीय अधिकाऱ्यांचे साटेलोटे असल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून बेकायदेशिररीत्या शिष्यवृत्ती मिळविली जात आहे. परिणामी शासनाचे कोट्यवधी रुपये संस्था संचालक व अधिकाऱ्यांच्या खिशात जात आहेत, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, दोषी संस्था संचालक व अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी व संस्था संचालकांनी अवैधपणे मिळविलेली शिष्यवृत्ती परत घेण्यात यावी, अशी विनंतीही याचिकाकर्त्याने केली आहे.
याचिकेत राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधे विभागाचे सचिव, सामाजिक न्याय विभागाचे सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव, समाजकल्याण आयुक्त, महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल, शिक्षण शुल्क समितीचे सचिव, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ आदींना प्रतिवादी करण्यात आले आहे. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. आदित्य देशपांडे कामकाज पाहणार आहेत. (प्रतिनिधी)