वृद्धाला पाळीव कुत्रा चावला, डॉक्टरच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल
By योगेश पांडे | Updated: April 6, 2025 22:43 IST2025-04-06T22:41:54+5:302025-04-06T22:43:31+5:30
इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

वृद्धाला पाळीव कुत्रा चावला, डॉक्टरच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल
योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: एका वृद्धाला शेजारी राहणाऱ्या डॉक्टरकडील पाळीव कुत्रा चावल्याने त्याच्या कुटुंबियांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी डॉक्टरच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
कल्पना अनिलराव चौधरी (६२, एमआयजी कॉलनी, वकीलपेठ, रेशीमबाग) असे तक्रारदार महिलेचे नाव आहे. २ एप्रिल रोजी त्यांचे पती अनिलराव चौधरी (६५) हे त्यांच्या घरातील कुत्र्याला घेऊन सायंकाळी साडेचार वाजता फिरायला गेले. त्यांच्या शेजारी डॉ.पंडित राहतात. त्यांच्या कडे गोल्डन रिट्रीव्हर प्रजातीचा कुत्रा आहे. कुत्र्याचा केअरटेकरदेखील त्याला त्याच वेळी फिरायला घेऊन आला. त्या कुत्र्याने चौधरी यांच्या पाळीव कुत्र्यावर हल्ला केला. चौधरी यांनी मध्यस्थी केली असता डॉ.पंडित यांच्याकडील कुत्र्याने त्यांना चावा घेतला. परिसरात कुणीच नसल्याने कुत्रा चौधरींवर हल्ला करतच होता.
काही वेळाने डॉ.पंडित यांची पत्नी आली व ती कुत्र्याला घेऊन गेली. जून २०२४ मध्येदेखील तो कुत्रा कल्पना चौधरी यांना चावला होता. त्यावेळी डॉ.पंडित यांच्या पत्नीला कुत्र्याबाबत योग्य उपाययोजना करण्यास सांगण्यात आले होते. मात्र तो कुत्रा सातत्याने लोकांवर भुंकतो व धावून जातो. अखेर या घटनेनंतर कल्पना यांनी तक्रार केली. पोलिसांनी डॉ.पंडित यांच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.