दोन दिवसांवर आले होते त्याचे लग्न, अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2022 19:36 IST2022-05-10T19:36:17+5:302022-05-10T19:36:45+5:30
Nagpur News अवघ्या दोन दिवसांवर लग्न आले असताना वायुदलाचा कर्मचारी अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणात अडकला आहे.

दोन दिवसांवर आले होते त्याचे लग्न, अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार
नागपूर : अवघ्या दोन दिवसांवर लग्न आले असताना वायुदलाचा कर्मचारी अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणात अडकला आहे. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून, २८ वर्षीय आदित्यधनराज नरेश साहू या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. लग्नाच्या दोन दिवस आधी मुलगा बलात्कारप्रकरणी तुरुंगात गेल्याने साहूच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे.
साहू गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या जवळच राहतो व पीडित १५ वर्षीय विद्यार्थिनीदेखील त्याच कॅम्पसमध्ये राहते. एअरफोर्समध्ये कॉर्पोरल असणारा अदित्यधनराज दुसऱ्या राज्यात तैनात आहे. १२ मे रोजी लग्न असल्याने तो रजेवर घरी आला. लग्नाची तयारी सुरू असताना तो संबंधित मुलीच्या घरी गेला. संधी साधून त्याने विद्यार्थिनीशी बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. हा प्रकार कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. या घटनेची माहिती अल्पवयीन मुलीने कुटुंबीयांना दिली.
अल्पवयीन मुलीच्या नातेवाइकांनी गिट्टीखदान पोलीस ठाणे गाठले व त्यांनी तक्रार दाखल केली. पोलिसांनी साहूला बलात्कार आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर अटक केली. १२ मे रोजी लग्न असल्याने वधूचे कुटुंबीयही नागपूरला रवाना झाले होते. या घटनेची माहिती मिळताच त्यांनाही धक्का बसला. एपीआय राजेश खंडाळे यांनी साहूला न्यायालयात हजर करून त्याला ताब्यात घेतले आहे.