कोविड संसर्ग: कार्यक्रमासाठी घ्यावी लागेल आठ दिवसापूर्वी परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 12:11 IST2021-02-19T12:09:48+5:302021-02-19T12:11:30+5:30
Nagpur News कोविड संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेता महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी गुरुवारी सुधारित आदेश जारी केले आहेत. त्यानुसार आता शहरात कोणताही सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करावयाचा झाल्यास आठ दिवस आधी झोनच्या सहायक आयुक्तांची परवानगी घ्यावी लागेल.

कोविड संसर्ग: कार्यक्रमासाठी घ्यावी लागेल आठ दिवसापूर्वी परवानगी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेता महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी गुरुवारी सुधारित आदेश जारी केले आहेत. त्यानुसार आता शहरात कोणताही सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करावयाचा झाल्यास आठ दिवस आधी झोनच्या सहायक आयुक्तांची परवानगी घ्यावी लागेल. विना परवानगी कार्यक्रमाचे आयोजन केल्यास आयोजकावर कठोर कारवाई होणार आहे. अशा कार्यक्रमावर मनपाच्या झोन कार्यालयासोबतच उपद्रव शोध पथकांची नजर राहणार आहे.
लग्न समारंभांना ५० लोकांना मंजुरी दिली आहे. त्याशिवाय नाटक, सिनेमागृह, सभा, बैठका सार्वजनिक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, सभागृहात आयोजित कार्यक्रमांना एकूण क्षमतेच्या २५ टक्के अथवा १०० लोकांपेक्षा कमी असेल त्याला मंजुरी दिली जाईल. तसेच कोणत्याही कार्यक्रमासाठी आठ दिवस आधी परवानगी घेतली असेल तरच करता येईल.
दिशा-निर्देशांचे पालन ही आयोजकांची जबाबदारी
कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करताना परवानगी घेण्यासोबतच सर्वांना मास्क लावणे बंधनकारक आहे. जर एखाद्याने मास्कचा वापर केला नाही तर आयोजकांवर कारवाई केली जाईल. असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. कोविड संदर्भातील जारी दिशा -निर्देशांचे पालन करण्याची जबाबदारी संबंधित लॉन, मंगल कार्यालय, हॉटेल, प्रबंधक यांच्यावर राहील. याबाबत शपथपत्र द्यावे लागणार आहे.
१७९ नागरिकांवर कारवाई
मनपाच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी गुरुवारी मास्क शिवाय फिरणाऱ्या १७९ नागरिकांविरुध्द कारवाई करून ८९ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. या सर्व नागरिकांना मास्क सुध्दा देण्यात आले. मागील काही महिन्यात शोध पथकांनी ३२४५६ नागरिकांविरुध्द कारवाई करुन १ कोटी ४५लाख ८७ हजारांचा दंड वसूल केला आहे.