‘हाय रिस्क’ रुग्णांचे तात्काळ ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ करा; राधाकृष्णन बी. यांचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 20:59 IST2020-09-03T20:58:42+5:302020-09-03T20:59:27+5:30
‘हाय रिस्क’ रुग्णांचे प्राधान्याने ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ करून त्यांची तातडीने चाचणी केली जावी, असे निर्देश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी गुरुवारी दिले.

‘हाय रिस्क’ रुग्णांचे तात्काळ ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ करा; राधाकृष्णन बी. यांचे निर्देश
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता चाचण्यांची संख्या आणि वेग वाढावा या उद्देशाने शहरातील कोविड चाचणी केंद्रांची संख्या वाढविली आहे. सोबतच ‘हाय रिस्क’ रुग्णांचे प्राधान्याने ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ करून त्यांची तातडीने चाचणी केली जावी, असे निर्देश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी गुरुवारी दिले.
पाचपावली कोव्हिड केअर सेंटर, पाचपावली नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि पाचपावली सूतिकागृहाला आयुक्तांनी आकस्मिक भेट दिली. यावेळी अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा उपस्थित होते. चाचणी करताना योग्य खबरदारी घेतली जाते की नाही, निर्धारित वेळेतच चाचणी केली जाते का, चाचणी करण्यास येणाऱ्या नागरिकांकडून नियमांचे पालन करवून घेतले जाते का, या सर्व बाबींची पाहणी करण्यासाठी राधाकृष्णन बी. आणि जलज शर्मा यांनी आकस्मिक भेट दिली.
कोविड केअर सेंटर, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा सूतिकागृहामध्ये चाचणी केल्यानंतर पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेणे गरजेचे आहे. जलद पद्धतीने ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ करण्यासाठी ‘रॅपिड रिस्पॉन्स टीम’ तैनात करण्यात आली आहे. या टीमने आपली कार्यपद्धती वेगवान करण्याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या ‘हाय रिस्क’ रुग्णांचे प्राधान्याने ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ करून त्यांची तातडीने चाचणी करावी असे निर्देश दिले.
गरज भासल्यास मार्गदर्शन घ्या
नागरिकांनी कोविडसंदर्भातील कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरित आपल्या जवळच्या केंद्रात चाचणी करून घ्यावी. संपर्कातील एखादी व्यक्ती पॉझिटिव्ह आल्याचे लक्षात येताच स्वत: जबाबदारीने मनपाच्या कोविड चाचणी केंद्रातून चाचणी करून घ्यावी. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये लक्षणे असल्यास त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी केंद्रीय कॉल सेंटरवर फोन करून मार्गदर्शन घ्यावे. यासाठी ०७७१२- २५५१८६६,०७१२ - २५३२४७४,१८००२३३३७६४ हे कॉल सेंटरचे क्रमांक आहेत. आपल्याला रुग्णालयात दाखल व्हायचे असेल आणि कुठल्या रुग्णालयात बेड्सची उपलब्धता आहे, हे जाणून घ्यायचे असेल तर ०७१२- २५६७०२१ या क्रमांकावर कॉल करावे, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.