वसतिगृहातील विद्यार्थ्यांची टक्केवारी घसरतेय!
By Admin | Updated: June 2, 2014 02:13 IST2014-06-02T02:13:36+5:302014-06-02T02:13:36+5:30
विद्यार्थीदशेत असतानाच मोठे स्वप्न पाहायचे असते अन् त्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी जीवाचे

वसतिगृहातील विद्यार्थ्यांची टक्केवारी घसरतेय!
विद्यार्थीदशेत असतानाच मोठे स्वप्न पाहायचे असते अन् त्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी जीवाचे रान करण्याचे दिवसही हेच असतात. परंतु काहींच्या वाट्याला काहीच येत नाही तरी ते केवळ आपल्या कर्तृत्वाच्या बळावर यशाची नवी वाट शोधून काढतात. तर काहींना सर्व सुविधा मिळूनही आपल्याच जीवनाचा शिल्पकार होता येत नाही. शहरातील मुलांच्या शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांचीही सध्या अशीच दशा झाली आहे. दुर्गम भागातील विद्यार्थी शैक्षणिक स्पर्धेत शहरी विद्यार्थ्यांपेक्षा कमी पडू नये म्हणून विद्यार्थ्यांना शासनाने राहण्या, खाण्याबरोबरच त्यांच्या निर्वाह भत्त्याची सोय केली आहे. मात्र शिक्षणासाठी शहरात आलेले बहुतांश विद्यार्थी आपली हुशारी टिकवून ठेवण्यात अपयशी ठरत आहे. शहरातील मुलांच्या शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या गुणांची टक्केवारी घसरत असल्याचे दिसून येत आहे. मुलगा शिकून साहेब बनेल, या भावनेने आईवडिलांनी मुलांना शहरात पाठविले. मात्र मुलांनी त्यांचा अपेक्षाभंग केला आहे. शासनाप्रति असलेल्या कर्तव्याचीही जाणीव त्यांच्यात राहिलेली दिसत नाही. नागपूर शहरात मुलांची ८ शासकीय वसतिगृहे आहे. त्यातच चोखामेळा हे वसतिगृह प्रसिद्ध आहे. या वसतिगृहात अनेक प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर, इंजिनिअर घडले आहे. आजही त्यांना वसतिगृहाचा अभिमान आहे. पूर्वी नागपुरात वसतिगृहाची संख्या कमी होती. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शिक्षणाकडे कल वाढल्याने, शासनाने वसतिगृहांची संख्या वाढविली. पूर्वी वसतिगृहात फारशा सुविधाही उपलब्ध नव्हत्या. अशातही त्याकाळच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या पताका फडकविल्या. मात्र सध्या वसतिगृहात विद्यार्थ्यांना पोषक अशा सुविधा उपलब्ध असतानाही, विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा खालावतो आहे. ग्रामीण भागातून शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांंना मेरिटनुसार प्रवेश देण्यात येतो.