लोक फिरताहेत रस्त्यांवर : ही शिथिलता कोरोनाचा प्रकोप वाढवणारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 10:09 PM2020-05-16T22:09:08+5:302020-05-16T22:18:02+5:30

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून लॉकडाऊन करण्यात आले आहे. मागील दोन ते अडीच महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये प्रशासनाने थोडी शिथीलता देत काही दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. परंतु गेल्या दोन दिवसांपासून नागरिक ज्या पद्धतीने सर्रासपणे वावरत आहेत. त्यामुळे ही शिथिलता कोरोनाचा प्रकोप वाढवणारी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

People roaming the streets: This laxity exacerbates the Corona outbreak | लोक फिरताहेत रस्त्यांवर : ही शिथिलता कोरोनाचा प्रकोप वाढवणारी

लोक फिरताहेत रस्त्यांवर : ही शिथिलता कोरोनाचा प्रकोप वाढवणारी

googlenewsNext
ठळक मुद्देदुकानांमध्येही अनावश्यक गर्दी : ट्रीपल सीटवाले बेभान : अनेकांकडून मास्कचा वापरही नाहीलोकमत जागर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून लॉकडाऊन करण्यात आले आहे. मागील दोन ते अडीच महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये प्रशासनाने थोडी शिथीलता देत काही दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. परंतु गेल्या दोन दिवसांपासून नागरिक ज्या पद्धतीने सर्रासपणे वावरत आहेत. त्यामुळे ही शिथिलता कोरोनाचा प्रकोप वाढवणारी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.


लॉकडाऊनच्या चौथ्या सत्रात आपण पोहोचले आहोत. १७ मे रोजी तिसरा लॉकडाऊन संपत आहे. तो आणखी ३१ मे पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. नागपुरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने हा लॉकडाऊन निश्चित वाढेल. परंतु मागील अडीच महिन्यांपासून लोक घरी आहेत. व्यवसाय, प्रतिष्ठाने बंद आहेत. छोट्या दुकानदारांचे जगणे कठीण झाले आहे. त्यामुळे लॉकडाऊन वाढवत असतानाच सरकारने लॉकडाऊनदरम्यान थोडी शिथिलता बहाल केली आहे. शासकीय कार्यालयांसह कारखाने सुरू केले आहेत. काही दुकानांनाही सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. ती सुरु करताना अटी व शतीही घातल्या आहेत. परंतु नागरिकांकडून या शिथिलतेचा गैरफायदा होत असल्याचेच दिसून येत आहे. मागील दोन दिवसात लोक सर्रासपणे रस्त्यांवर फिरत आहे. दुचाकीने ट्रिपल सीट जात आहे. इकतेच नव्हे तर तोंडाला मास्क न घालताही लोक फिरत आहेत. गर्दी करीत आहेत. जनरल स्टोअर्स सुरू झाल्याने लोकांची अनावश्यक गर्दी वाढल्याचे दिसून येत आहे. लोक रस्त्यांवर असे वावरताना दिसून येत आहेत की जणू कोरोना संपलेलाच आहे. नागपूर अजूनही कोरोनाच्या संदर्भात रेड झोनमध्ये आहे. तेव्हा नागरिकांचा हा निष्काळजीपणा येणाऱ्या दिवसात मोठा धोका निर्माण करणारा ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मॉर्निंग- इव्हीनिंग वॉकही सुरू

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे गर्दी होऊ न देणे हा आहे. त्यासाठीच लॉकडाऊन करण्यात आले. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, अशी अपेक्षा आहे. प्रशासनाने स्पष्टपणे तसे आदेश दिले आहेत. यामध्ये मॉर्निंग वॉक व इव्हीनिंग वॉकवर सुद्धा बंदी घालण्यात आलेली आहे. मात्र गेल्या काही दिवसापासून लोक सर्रासपणे मॉर्निंग वॉक व इव्हीनिंग वॉकला निघत आहेत. आरोग्याच्या दृष्टीने हे चांगले असले तरी सध्याच्या परिस्थितीत असे करणे हे इतरांसाठीच नव्हे तर स्वत:सोबत आपल्या कुटुंबीयांसाठी सुद्धा धोक्याचे ठरू शकते.

चौकांमध्ये गर्दी
लॉकडाऊमध्ये प्रत्येक चौक सुनसान होते. चौकात पोलीस तैनात असल्याने नागरिकही फारसे दिसून यायचे नाहीत. परंतु आता बहुतांश चौकातून पोलिसांना हटवण्यात आले आहे. त्यातच मागील दोन दिवसापासून चौकात तरुणांनी गर्दी विनाकारण वाढली आहे. लोक घोळका करून गप्पागोष्टी करताना दिसून येत आहेत. यातील बहुतेकांकडे मास्कही नसतात. फिजिकल डिस्टन्सिंग तर दूरच राहिले.

ऑनलाईन दारूमुळेही गर्दीत भर
शहरात दारूची दुकाने बंद आहेत. परंतु ऑनलाईन दारू विक्रीला परवानगी मिळालेली आहे. ऑनलाईन ऑर्डरसाठी दुकानांसमोर मोबाईल क्रमांकांचे मोठे बॅनर लावण्यात आले आहे. त्यामुळे दारुच्या ऑनलाईन ऑर्डरसाठीसुद्धा दारूच्या दुकानासमोर लोकांची गर्दी होत आहे.

...तर पोलिसांना पुन्हा हातात दंडा घ्यावा लागेल
लॉकडाऊनच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी सुरुवातीला पोलिसांनी कठोर भूमिका घेतली होती. ती आवश्यकही होती. त्यामुळेच लॉकडाऊनचा परिणाम दिसून आला. शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. ही चिंतेची बाब आहे. मात्र प्रशासनाने बहाल केलेल्या शिथिलतेचा गैरफायदा घेऊन सध्या नागरिक जणू कोरोना नागपुरातून संपला की काय अशा आवेशात वागत आहे. नागरिकांनी वेळीच सावध होण्याची गरज आहे. नागरिक असेच बेजबाबदारपणे वागत राहिले तर पोलिसांना पुन्हा एकदा कठोर व्हावे लागेल.

Web Title: People roaming the streets: This laxity exacerbates the Corona outbreak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.