भारताबाहेरील लोकांना ‘आयकॉन’ म्हणून माथी मारले जाते
By योगेश पांडे | Updated: July 14, 2025 12:55 IST2025-07-14T12:54:18+5:302025-07-14T12:55:26+5:30
सदानंद सप्रे : देवर्षी नारद पत्रकारिता सन्मान पुरस्कारांचे वितरण, ‘लोकमत’चे डॉ. योगेश पांडे यांचा सन्मान

People outside India are being praised as 'icons'
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अगदी प्राचीन काळापासून आपल्या देशात विविध क्षेत्रांत सक्षम व कर्तृत्ववान असलेले लोक होऊन गेले आहेत. मात्र, भारताबाहेरील लोकांना जाणूनबुजून ‘आयकॉन’ म्हणून माथी मारले जाते. अशा तत्त्वांचा विरोध करताना सकारात्मकतेतून आदर्श प्रस्थापित करण्यावर भर असला पाहिजे. अशाच सकारात्मक विचारसरणीतूनच देवर्षी नारद हे पत्रकारांचे आदर्श असल्याची बाब प्रस्थापित झाली आहे, असे प्रतिपादन प्रज्ञा प्रवाह संस्थेचे अखिल भारतीय सदस्य सदानंद सप्रे यांनी केले. विश्व संवाद केंद्राच्या वतीने रविवारी आद्य पत्रकार देवर्षी नारद पत्रकारिता सन्मान पुरस्कारांचे वितरण झाले. त्यावेळी ते बोलत होते.
वनामती सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर संघचालक राजेश लोया, निवड समितीचे प्रमुख सुधीर पाठक व संघाचे प्रांत प्रचार प्रमुख संजय गुळवे प्रामुख्याने उपस्थित होते. याशिवाय प्रसिद्ध पत्रकार ऋचा अनिरुद्ध या ऑनलाइन माध्यमातून उपस्थित होत्या. मुद्रित माध्यमांतील उल्लेखनीय योगदानासाठी ‘लोकमत’चे मुख्य उपसंपादक डॉ. योगेश प्रकाश पांडे यांचा प्रमुख अतिथींच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याशिवाय योगेंद्र तिवारी, नरेश शेळके, राखी चव्हाण, सतीश राऊत, आशिष भारतवंशी, दिवाकर सावरकर, तरुण जगनाडे, वैभव बावनकर, आरजे पल्लवी, ऐश्वर्या शिंदे, वेदिका मिश्रा, प्रियांशू चौधरी यांचाही पुरस्काराने सन्मान झाला.
पत्रकारिता हे राष्ट्रसेवेचे माध्यम अनेक जण समजतात. मात्र, त्यातून केवळ व्यक्तिगत समाधान न मिळवता सर्वांनाच तसे करण्यावर भर असला पाहिजे, असे सप्रे म्हणाले. माध्यमांमध्ये वादविवाद दिसून येतो. मात्र कुटुंब व समाजातदेखील तशीच स्थितीत दिसून येते. जर माध्यमांत वाईट गोष्टी दाखविल्या जात असतील तर ते बघणे किंवा वाचणे आपण थांबवावे, असे मत राजेश लोया यांनी व्यक्त केले.
पत्रकारांनी देशाकरिता काय योग्य आहे आणि काय नाही, याचा विचार करून बातम्या द्याव्या, असे आवाहन यावेळी सुधीर पाठक यांनी केले. जय गाला यांनी संचालन केले तर साक्षी सरोदेने वैयक्तिक गीत सादर केले.
‘रील’ संस्कृती पत्रकारितेसाठी घातक : ऋचा अनिरुद्ध
आजकाल प्रसारमाध्यमांतून एखादा मुद्दा महत्त्वाचा नसला तरी त्यावर चर्चा घडविले जाते. त्यातही सध्या रील संस्कृती वाढली असून, ही पत्रकारितेच्या तत्त्व व दर्जासाठी घातक आहे. पत्रकारितेतून नकारात्मकता न मांडता समाजातील चांगल्या गोष्टीही लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. सध्या भाषेवरून होणारे वाद दुर्दैवी आहेत. पत्रकारांनी हा भाषावाद संपविण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असेदेखील त्या म्हणाल्या.