दामदुपटीच्या नावाखाली नागरिकांची सव्वा कोटी रुपयांनी फसवणूक
By Admin | Updated: August 19, 2014 01:24 IST2014-08-19T00:46:03+5:302014-08-19T01:24:17+5:30
वासनकर घोटाळा : शहरातील १५0 च्यावर गुंतवणूकदारांनी केली गुंतवणूक

दामदुपटीच्या नावाखाली नागरिकांची सव्वा कोटी रुपयांनी फसवणूक
अकोला : नागपूरच्या श्रीसूर्या इन्व्हेस्टमेंट प्रा. लि. कंपनीच्या घोटाळय़ानंतर वासनकर वेल्थ मॅनेजमेंट प्रा. लि कंपनीमधील कोट्यवधी रुपयांचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. श्रीसूर्या कंपनीसोबतच अकोल्यातील १५0 च्यावर नागरिकांनी वासनकर कंपनीतसुद्धा मोठी गुंतवणूक केली. सिव्हिल लाईन पोलिसांनी १३ ऑगस्ट रोजी गजाआड केलेल्या तिघा आरोपींनी शहरातील नागरिकांची जवळपास सव्वा कोटी रुपयांनी फसवणूक केल्याची माहिती दिली. श्रीसूर्या इन्व्हेस्टमेंट कंपनीतील गुंतवणूकदारांच्या तक्रारीनंतर काही दिवसांमध्ये वासनकर वेल्थ मॅनेजमेंट प्रा. लि कंपनीच्या सुद्धा तक्रारी यायला लागल्या. तक्रारींच्या आधारे नागपुरातील अंबाझरी पोलिसांनी प्रशांत वासनकर, विथिला वासनकर, विनय जयदेव वासनकर, अभिजित जयंत चौधरी आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना २७ जुलै रोजी अटक केली होती. त्यानंतर दीड महिन्यांनंतर अकोल्यातील अरुण साहेबराव देशमुख यांनी सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यामध्ये त्यांची ५ लाख रुपयांनी फसवणूक झाल्याची तक्रार दिली होती. त्यांच्यानंतर कपिलनगरात राहणारे पाटबंधारे विभागातील सेवानवृत्त कर्मचारी जयंत नारायण देशपांडे (६८) यांनी वासनकर कंपनीमध्ये १५ लाख रुपयांची गुंतवणूक केल्याची तक्रार दिली. तक्रारीमध्ये आरोपींनी शहरामध्ये ठिकठिकाणी कंपनीचे सेमिनार घेऊन शेकडो गुंतवणूकदारांना विविध आमिषे दाखवून त्यांची कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून घेतली. सुरुवातीला कंपनीकडून गुंतवणूकदारांना पैशांचे धनादेश मिळत गेल्याने, लालसेपोटी अनेक नागरिकांनी कंपनीमध्ये गुंतवणूक केली. शहरातील जवळपास १५0 च्यावर नागरिकांनी सव्वा कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याची माहिती आरोपींनी पोलिसांना दिली.