"रामजन्मभूमी आंदोलनातील मोरोपंत पिंगळेंच्या योगदानाची जनतेला माहितीच नाही"; सरसंघचालक मोहन भागवत
By योगेश पांडे | Updated: July 9, 2025 23:07 IST2025-07-09T23:02:37+5:302025-07-09T23:07:04+5:30
मोरोपंत पिंगळेंच्या जीवनावरील इंग्रजी पुस्तकाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्या हस्ते प्रकाशन

"रामजन्मभूमी आंदोलनातील मोरोपंत पिंगळेंच्या योगदानाची जनतेला माहितीच नाही"; सरसंघचालक मोहन भागवत
योगेश पांडे
नागपूर : रामजन्मभूमी आंदोलन उभे करण्यात ज्येष्ठ प्रचारक मोरोपंत पिंगळे यांचे मौलिक योगदान होते. राम जन्मभूमी आंदोलनातही मोरोपंतांनी अशोक सिंघल यांनाच समोर ठेवले. स्वतः कधीही पुढे-पुढे केले नाही. प्रसिद्धीपासून लांब राहून कार्य करण्याचा वस्तुपाठ त्यांनी आपल्या आचरणातून मांडला होता. मात्र आजही लोकांना पिंगळे यांच्या योगदानाबाबत हवी तशी माहिती नाही, अशी खंत व्यक्त करत सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी त्यांचे काम नवीन पिढीपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. पत्रकार मंदार मोरोणे तसेच प्रांजली काणे लिखित मोरोपंत पिंगळेंच्या जीवनावरील इंग्रजी पुस्तकाचे त्यांच्या हस्ते बुधवारी प्रकाशन झाले. त्यावेळी ते बोलत होते.
वनामती येथे हा कार्यक्रम झाला. हसत-खेळत कार्यशैली ही मोरोपंत पिंगळेंचे वैशिष्ट्य होती. कुठलेही काम करताना ते मी केले असा अहंभाव त्यांच्यात कधीच राहिला नाही. देशात आणीबाणी संपल्यानंतर निवडणुकीत काय होईल..? असा विषय सहज चर्चेत निघाला असता. मोरोपंत म्हणाले होते की, विरोधी पक्ष एकत्रित लढले तर २७६ खासदार निवडून येतील. परंतु, त्यांच्या विधानावर कुणाला त्याकाळी विश्वास बसला नाही. परंतु, निवडणुकीचा निकाल लागल्यावर मोरोपंतांचे भाकित खरे ठरले, असे सरसंघचालकांनी सांगितले.
मोरोपंत पिंगळेंची पंच्याहत्तरी झाली त्यावेळी वृंदावन येथे आयोजित बैठकीत तत्कालिन सरकार्यवाह हो.वे. शेषाद्री यांनी मोरोपंतांचा सन्मान केला होता. मला पंच्याहत्तरीचा अर्थ मला कळतो. माणसाची पंच्याहत्तरी झाली की, आपण बाजुला होऊन इतरांना संधी दिली पाहिजे असे मोरोपंत म्हणाले होते अशी आठवण सरसंघचालकांनी यावेळी सांगितली. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष अशोकराव चौगुले, राहुल पाठारे, संतोष पिंगळे, रवींद्र गोळे, महेश राव प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ.भालचंद्र हरदास यांनी संचालन केले.