सुमेध वाघमारे नागपूर : एका रुग्णाला आठ वर्षांपूर्वी कर्करोगामुळे लिंग गमवावे लागले होते. राजस्थानमधील या रुणाचे संपूर्ण लिंग एकाच टप्प्यात पुन्हा तयार करून एक दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. ही शस्त्रक्रिया तब्बल ९.३० तास चालली. अशा प्रकारची मध्यभारतातील ही पहिली शस्त्रक्रिया असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. या शस्त्रक्रियेने रुग्णाला नवे आयुष्य मिळाले.
एनकेपी साळवे वैद्यकीय महाविद्यालय व लता मंगेशकर हॉस्पीटल येथे प्लास्टिक सर्जरी विभागाद्वारे ही शस्त्रक्रिया करण्यात आली. लिंगाची रचना तयार करण्यासाठी रुग्णाच्या हाताच्या वरच्या बाजूला शाफ्ट आणि मूत्रमार्ग (मूत्रमागार्ची नळी) पुनर्बांधणी करण्यात आली आणि नंतर जघन भागात लावण्यात आले. लिंगात रक्तपुरवठा करणे, नसांमध्ये पूर्ण संवेदना प्रदान करणे आणि एक कार्यशील अवयव निर्माण करण्यासाठी सूक्ष्म रक्तवाहिन्या जोडणे या बाबींचा समावेश या शस्त्रक्रियेमध्ये होता. ही संपूर्ण शस्त्रक्रिया एका टप्प्यात करण्यात आली.
मायक्रोव्हस्क्युलर शस्त्रक्रियाअशा शस्त्रक्रियांना मायक्रोव्हस्क्युलर शस्त्रक्रिया म्हणतात. यासाठी आवश्यक असलेला अत्याधुनिक आॅपरेटिव्ह मायक्रोस्कोप रुग्णालयामध्ये उपलब्ध आहे. कर्करोगाव्यतिरिक्त अशा पुनर्रचनात्मक प्रक्रिया, ट्रॉमाटिक (अपघाती) लिंग विच्छेदन आणि लिंग पुष्टीकरण शस्त्रक्रिया (लिंग बदल शस्त्रक्रिया) असलेल्या रुग्णांसाठी या सुविधा फायदेशीर ठरू शकतात, अशी माहिती हिंगणा रोड येथील लता मंगेशकर हॉस्पीटलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी दिली.
सुक्ष्म रक्तवाहिन्या जोडणे गुंतागुंतीची प्रक्रियाडॉ. अभिराम मुंडले यांनी सांगितले, दोन मिलिमीटरच्या सुक्ष्म रक्तवाहिन्या म्हणजे लहान धमन्या आणि शिरा ज्यांचा अंतर्गत व्यास १ ते ६ मिमी पर्यंत असतो, त्या जोडणे हे या शस्त्रक्रियेतील सर्वात गुंतागुंतीची प्रक्रिया होती. प्लास्टिक सर्जरी विभागाच्या चमूने आपले अनुभव व कौशल्याचा बळावर ती यशस्वी केली.
या डॉक्टरांनी केली यशस्वी शस्त्रक्रिया अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्या मार्गदर्शनात प्लास्टिक सर्जरी विभागाचे डॉ. जितेंद्र मेहता, डॉ. समीर महाकाळकर, डॉ. अश्विनी पंडितराव, डॉ. देव पटेल, डॉ. अभिराम मुंडले, डॉ. कंवरबीर, डॉ. पल्लवी या चमूने ही कामगिरी पार पाडली. डॉ. अंजली भुरे, डॉ. मधुश्री शहा, डॉ. केतकी मारोडकर, डॉ. रचना नैताम, डॉ. गुंजन यांनी या प्रक्रियेसाठी बधिरीकरणाचे काम केले. वैद्यकीय अधिक्षक व उपअधिष्ठाता डॉ. नितीन देवस्थळे यांनी सर्व लॉजिस्टिक सपोर्ट प्रदान केला.