नियमानुसार वेतन द्या, अन्यथा कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2015 02:56 IST2015-09-18T02:56:53+5:302015-09-18T02:56:53+5:30

विभागातील काही अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नियमानुसार वेतन देण्यात येत नाही ही नेहमीचीच ओरड असते.

Pay as per the rules, otherwise action | नियमानुसार वेतन द्या, अन्यथा कारवाई

नियमानुसार वेतन द्या, अन्यथा कारवाई


नागपूर : विभागातील काही अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नियमानुसार वेतन देण्यात येत नाही ही नेहमीचीच ओरड असते. या महाविद्यालयांवर कारवाईचे प्रमाणदेखील नगण्यच आहे. परंतु ‘डीटीई’ने (डायरेक्टोरेट आॅफ टेक्निकल एज्युकेशन) यासंदर्भात आता ठोस पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. संस्थांनी कर्मचाऱ्यांना नियमांनुसार वेतन व भत्ते देण्याचे निर्देश ‘डीटीई’कडून देण्यात आले आहेत. ज्या संस्था यांचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारादेखील देण्यात आला आहे.
अनेक विनाअनुदानित संस्थेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळत नाही. तसेच मिळणारे वेतन हे शासन तसेच अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या नियमांनुसार नसते. संस्थेला अंतिम मान्यता दिली जात असताना कर्मचाऱ्यांना वेळेवर व नियमांनुसार वेतन देण्यात येईल, अशी अटच टाकण्यात येते. परंतु संस्था त्यांचे पालन करत नाहीत. परिणामी कमी वेतनाअभावी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यासंदर्भात ‘डीटीई’ला अनेक तक्रारी प्राप्त झाल्या. मुंबई युनिव्हर्सिटी अ‍ॅन्ड कॉलेज टीचर्स असोसिएशनच्या ३०० सदस्यांनी आंदोलन केले होते. त्यानंतर तक्रारींचा ओघ वाढला व ‘डीटीई’ने या मुद्यावर ठोस कारवाई करण्याचा निर्णय घेतला. नागपूर विभागातील अनेक महाविद्यालयांबाबतदेखील तक्रारी प्राप्त झाल्या असून विभागीय सहसंचालक गुलाबराव ठाकरे यांनी यासंदर्भात सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांना पत्र लिहिले आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नियमांनुसार वेतन देण्यात येत नसल्याच्या तक्रारी येत असून यापुढे जर यात तथ्य आढळले तर संस्थेवर नियमांनुसार कडक कारवाई करण्यात येईल. शिवाय संबंधित संस्थेविरुद्ध कारवाईसाठी शासनाकडेदेखील शिफारस करण्यात येईल, असे या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे तांत्रिक शिक्षणाशी संबंधित महाविद्यालयांचे धाबे दणाणले असून कारवाईची कुऱ्हाड पडू नये यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Pay as per the rules, otherwise action