आधी शुल्क भरा, मगच शिक्षण घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:19 IST2021-01-13T04:19:13+5:302021-01-13T04:19:13+5:30
उमरेड : ज्या विद्यार्थ्याने शाळा शुल्काची रक्कम भरली नाही, त्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग बंद करण्याचा प्रकार उमरेड येथील एका ...

आधी शुल्क भरा, मगच शिक्षण घ्या
उमरेड : ज्या विद्यार्थ्याने शाळा शुल्काची रक्कम भरली नाही, त्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग बंद करण्याचा प्रकार उमरेड येथील एका शाळेने केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. ‘आधी शुल्क भरा, मगच ऑनलाईन या!’ असा आदेश या शाळेने काढल्याचा आरोप करीत शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे याप्रकरणाची तक्रार पालकांनी केली आहे. श्री देवरावजी ईटनकर पब्लिक स्कूल, उमरेड असे या शाळेचे नाव आहे. शुल्क मुद्यावरून पालक, शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन मंडळात सध्या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या आहेत. शासनाने निर्गमित केलेल्या शालेय पत्रानुसार शुल्क न भरल्याच्या कारणावरून विद्यार्थ्यांचे नियमित वर्ग बंद करू नये, असे आदेश आहेत. असे असतानाही दिनांक १८ डिसेंबर २०२० पासून अशा विद्यार्थ्यांचे नियमित ऑनलाईन वर्ग सदर शाळेने बंद केले, असे तक्रारीत नमूद आहे.
पालकांनी वारंवार विनंती केल्यानंतरही शाळा व्यवस्थापनाने अशा विद्यार्थ्यांचे नियमित वर्ग सुरू केले नाही. शिवाय अशा विद्यार्थ्यांची उद्या ११ जानेवारीपासून ठरविण्यात आलेली सत्र परीक्षासुद्धा न घेण्याचे पालकांना कळविण्यात आल्याची बाबही तक्रारीत आहे. याप्रकरणी शनिवारी पालक, शिक्षक आणि व्यवस्थापन मंडळाची बैठक झाली. सुमारे तीन तास चर्चेनंतरही कोणताही तोडगा न निघाल्याने पालक संतापले. शुल्क न भरणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा आणि वर्ग घेण्यास शाळेचा नकार असल्याची बाब स्पष्ट होताच पालकांनी याबाबत तक्रार केली.
---
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही यंदा कोणत्याही प्रकारची शुल्कवाढ केली नाही. पालकांवर कोणताही दबाव नाही. शिवाय १ जूनपासून सर्वच विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षण सुरू आहे.
टिना शुक्ला, मुख्याध्यापिका, श्री देवरावजी इटनकर पब्लिक स्कूल, उमरेड