ट्रेनच्या टॉयलेटमध्ये पाणी नसल्याने प्रवाशांनी रोखली ट्रेन; रेल्वे स्थानकावर जोरदार हंगामा

By नरेश डोंगरे | Updated: February 4, 2024 21:02 IST2024-02-04T21:00:46+5:302024-02-04T21:02:01+5:30

तासभर विलंब, दुरूस्तीनंतरही प्रवाशांना मनस्ताप

Passengers stopped the train because there was no water in the train's toilet; Heavy commotion at the nagpur railway station | ट्रेनच्या टॉयलेटमध्ये पाणी नसल्याने प्रवाशांनी रोखली ट्रेन; रेल्वे स्थानकावर जोरदार हंगामा

ट्रेनच्या टॉयलेटमध्ये पाणी नसल्याने प्रवाशांनी रोखली ट्रेन; रेल्वे स्थानकावर जोरदार हंगामा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ट्रेनमधील टॉयलेटमध्ये पाण्याची समस्या दूर होत नसल्याने संतप्त झालेल्या प्रवाशांनी पुरी अहमदाबाद एक्सप्रेस तब्बल एक तास रोखली. परिणामी नागपूर स्थानकावर रविवारी सकाळी गरमागरम वातावरण निर्माण झाले होते. दुरूस्तीच्या नावाखाली गाडीला एक तास विलंब झाला. मात्र, सूरत येईस्तोवर समस्या जैसे थेच असल्याने प्रवाशांमध्ये चांगलाच रोष निर्माण झाला होता.

पुरी - अहमदाबाद एक्सप्रेसच्या ए-२ कोचच्या टॉयलेटमध्ये गाडी सुटल्यापासूनच पाण्याची समस्या होती. त्यामुळे प्रवाशांनी त्याची रेल्वे स्टाफकडे तक्रार केली होती. मधल्या स्थानकावर गाडीत पाणी भरण्यात आले. मात्र, टॉयलेटच्या टंकीला गळती लागल्यामुळे त्यातून पाणी वाहून जात होते. परिणामी प्रवाशांची कुचंबना होत होती. अशात रविवारी सकाळी ८.२० वाजता गाडी नागपूर रेल्वे स्थानकावर पोहचली. मात्र समस्या तशीच असताना गाडी पुढे निघण्याचे संकेत मिळाल्याने ए-२ कोचच्या संतप्त प्रवाशांनी साखळी ओढून गाडी थांबविली.

प्रवासी संतप्त झाल्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाल्याचे बघून आरपीएफचे जवान धावले. प्रवासी आणि अधिकाऱ्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. त्यानंतर तब्बल १ तास परिश्रम घेऊन कर्मचाऱ्यांनी गळणाऱ्या टाकीची दुरूस्ती केली. त्यानंतर सकाळी ९.३० वाजता ट्रेन पुढे निघाली. याच गाडीत बसलेल्या नागपुरातील एका प्रवाशाने सांगितले की टंकीची दुरूस्ती झाल्याचे सांगितले गेले असले तरी समस्या जैसे थेच होती. रात्री ७ वाजता गाडी सूरतला पोहचल्यानंतरही रेल्वे प्रशासनाने टॉयलेटमध्ये पाणी उपलब्ध करून दिले नाही. परिणामी ए-२च्या कोचमधील प्रवासी ए-१ कोचच्या टॉयलेटमध्ये धाव घेऊ लागले.

प्रवासी भाडे घेऊनही प्रवाशांची कुचंबना
रेल्वे प्रशासन प्रवाशांकडून भाडे घेते मात्र प्रवाशांना पाहिजे तशी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तत्परता दाखवत नाही. ट्रेनमधील टॉयलेटमध्ये पाणी नसल्याची समस्या नेहमीचीच आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाकडून कायमस्वरूपी योजना होत नाही. त्यामुळे विविध मार्गावरील, वेगवेगळ्या गाड्यातील प्रवाशांची नेहमीच कुचंबना होते.
 

Web Title: Passengers stopped the train because there was no water in the train's toilet; Heavy commotion at the nagpur railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.