Passengers 'lift' in all buses | खोळंबलेल्या प्रवाशांना सर्वच बसेसमध्ये ‘लिफ्ट’

खोळंबलेल्या प्रवाशांना सर्वच बसेसमध्ये ‘लिफ्ट’

ठळक मुद्दे लालपरीच्या प्रवाशांना शिवशाहीसुध्दा घेणार

विलास गावंडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : अपघात झालेल्या, फेल पडलेल्या एसटी बसमधील प्रवाशांना आता खूप वेळ अडकून पडावे लागणार नाही. शिवशाहीसह सर्वच प्रकारच्या बसमध्ये लिफ्ट मिळणार आहे. शिवाय जादा भाडेही आकारले जाणार नाही. प्रवासी लोकवाहिनीकडे आकर्षित व्हावा, यासाठी महामंडळाने हे पाऊल उचलले आहे.
फेल पडलेल्या किंवा अपघात झालेल्या बसमधील प्रवाशांना ते ज्या श्रेणीच्या बसमधून प्रवास करीत असेल, त्याच श्रेणीची बस येईपर्यंत अडकून पडावे लागत होते. समोरून निमआराम, शिवशाही, शिवाई, शिवनेरी या बसेस भुर्रकन निघून जात होत्या, पण लालपरीच्या प्रवाशांना घेत नव्हत्या. घेतले तरी जादा भाडे मोजावे लागत होते. प्रवाशांना अंधारात, निर्मनुष्य ठिकाण, कोणत्याही सुविधा नसल्याच्या ठिकाणी थांबून राहावे लागत होते.
फेल पडलेल्या साध्या बसमधील प्रवाशांना मार्गावरून जाणाऱ्या कुठल्याही बसमध्ये घेणे सक्तीचे करण्यात आले आहे. यातूनच शिवशाही बससुध्दा सुटलेली नाही. पूर्वी ज्या बसमध्ये लिफ्ट मिळाली त्या बसचे तिकीट जास्त असल्यास अधिक भाडे द्यावे लागत होते. आता साध्या बसच्या प्रवाशाला त्याच बसच्या भाड्यामध्ये शिवशाहीला प्रवासी घ्यावे लागणार आहे.
खोळंबलेल्या प्रवाशांची होणारी गैरसोय आणि त्रास नागरिकांनी विविध माध्यमातून नागरिकांनी महामंडळाकडे मांडला होता. याची दखल घेत महामंडळाने सर्वच बसमध्ये प्रवासी घेण्याचे परिपत्रक काढले आहे. फेल पडलेल्या किंवा अपघात झालेल्या ठिकाणी शक्यतो त्याच श्रेणीची बस पाठविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मात्र अशी बस नसल्यास मार्गात असलेल्या कुठल्याही श्रेणीच्या बसचा पर्याय आहे.

तर कर्मचाऱ्यांवर कारवाई
बिघाड झालेल्या श्रेणीची बस उपलब्ध असताना उच्च श्रेणीची बस दिल्यास त्याची जबाबदारी निश्चित करून झालेल्या नुकसानीची जबाबदारी संबंधित कर्मचाºयांकडून वसूल केली जाणार आहे. शिवाय पर्यायी बस पाठविण्यास सक्षम कारणाशिवाय विलंब झाल्यास खातेनिहाय कठोर कारवाईची तदतूद करण्यात आली आहे.

Web Title: Passengers 'lift' in all buses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.