इथेनॉल बसला मिळताहेत प्रवासी
By Admin | Updated: January 15, 2015 01:00 IST2015-01-15T01:00:03+5:302015-01-15T01:00:03+5:30
ग्रीन सिटी, क्लीन सिटी संकल्पनेच्या आधारावर देशात पहिल्यांदा नागपूर शहरात इथेनॉल बस सुरू करण्यात आली. गेल्या दोन महिन्यात नागपूरकरांनी या बसला चांगला प्रतिसाद दिला आहे.

इथेनॉल बसला मिळताहेत प्रवासी
एक लिटरमध्ये धावते १.७० किमी
राजीव सिंह -नागपूर
ग्रीन सिटी, क्लीन सिटी संकल्पनेच्या आधारावर देशात पहिल्यांदा नागपूर शहरात इथेनॉल बस सुरू करण्यात आली. गेल्या दोन महिन्यात नागपूरकरांनी या बसला चांगला प्रतिसाद दिला आहे. ही बस इथेनॉलवर धावत असल्यामुळे या बसवर अधिक खर्च होत असला तरी, नागरिकांचे आरोग्य व पर्यावरणाचा विचार करता ही बस फायद्याचीच आहे.
प्राप्त माहितीनुसार, ग्रीन बस रिझर्व्ह बँक चौक ते खापरी चौकादरम्यान धावते. एक लिटर इथेनॉलमध्ये १.६५ ते १.७० किलोमीटरचा पल्ला गाठला जात आहे. दररोज ११५ ते १२० लिटर इथेनॉलचा वापर केला जात आहे. ही बस दररोज सुमारे १९६ किलोमीटर धावत आहे. पूर्णपणे वातानुकूलित असलेल्या या बसमध्ये पहिल्या दोन किलोमीटरसाठी १० रुपये भाडे आकारले जाते. तिकिटांपासून दररोज ३६५० रुपये ते ३८०० रुपये मिळत आहेत. १४ फेऱ्यांमध्ये २९५ ते ३०० प्रवासी प्रवास करतात. स्वीडनच्या स्कॅनिया कंपनीने ही बस तयार केली आहे. बस इको फ्रेंडली आहे. यामुळेच केंद्रीय भूपृष्ठ व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी सर्वप्रथम नागपुरात ही बस सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला. नागपुरात हा प्रयोग यशस्वी ठरला तर संपूर्ण देशात केंद्रीय योजना राबवून ही बस चालविण्याचा विचार सुरू आहे.
महापालिकेच्या परिवहन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेने पाठविलेल्या दरसूचीला आरटीओने मंजुरी दिली व त्यानंतर बस सुरू करण्यात आली. सुरुवातीचे दोन आठवडे कुठलेही भाडे आकारण्यात आले नाही. मुंबईत बेस्टच्या बसमध्ये किमान तिकीट २० रुपये आहे. नागपुरात मात्र ग्रीन बसचे किमान भाडे १० रुपये आहे. नागपूरची शहर बससेवा वातानुकूलीत नाही. त्यामुळे ही इथेनॉल बस हाच एकमेव पर्याय आहे. (प्रतिनिधी)
मार्चमध्ये येणार नवी बस
शहरातील इतर मार्गांवर इथेनॉल बस चालविण्याच्या उद्देशाने स्कॅनिया कंपनीने आणखी चार बसेस देण्याचा निर्णय घेतला आहे. या बसेस जानेवारीच्या सुरुवातीलाच येणार होत्या. मात्र, तांत्रिक कारणांमुळे पोहोचू शकल्या नाही. आता मार्चमध्ये या बसेस मिळण्याची शक्यता आहे.