एसी कोचमधील प्रवाशांचा गोंधळ

By Admin | Updated: June 2, 2014 02:20 IST2014-06-02T02:20:44+5:302014-06-02T02:20:44+5:30

गर्मीच्या दिवसात प्रवास सुखद होण्यासाठी प्रवासी एसी कोचची मागणी करतात.

Passengers of AC coach | एसी कोचमधील प्रवाशांचा गोंधळ

एसी कोचमधील प्रवाशांचा गोंधळ

नागपूर : गर्मीच्या दिवसात प्रवास सुखद होण्यासाठी प्रवासी एसी कोचची मागणी करतात. प्रवाशांना पैसे देऊनही एसीचा गारवा मिळत नसेल तर त्यांचा संताप सहाजिकच वाढणार. अशीच घटना नागपूर रेल्वेस्थानकावर उभ्या असलेल्या अहिल्यानगरी एक्स्प्रेसमध्ये घडली. या गाडीतील एसी नादुरुस्त झाल्याने, गर्मीमुळे हैराण झालेल्या प्रवाशांनी गोंधळ घालणे सुरू केले. शेवटी रेल्वे प्रशासनाने या गाडीला नवीन एसी कोच लावून, प्रवाशांचे समाधान केले आणि जेवढा वेळ एसी बंद होता, त्यावेळात प्रवाशांना झालेल्या मनस्तापाची नुकसानभरपाई दिली.

तिरुवनंतपुरमहून इंदोरला निघालेल्या अहिल्यानगरी एक्स्प्रेसच्या एसी कोच ए-१ (क्रमांक - 0४0६४) मध्ये ४२ प्रवासी प्रवास करीत होते. यात ठोंबरे कुटुंबीयांचे १७ सदस्य होते. जे कोलम येथून लग्नकार्य आटोपून इंदोरला जात होते. कोलमपासूनच एसीकाम करीत नव्हता. रेल्वेच्या टीसीला तक्रार करीत, त्यांनी कशीबशी रात्र काढली. मात्र सकाळी ७ वाजता विजयवाडा स्टेशनहून गाडी निघाल्यानंतर एसी पूर्णत: बंद झाला. जसजसा सूर्य वर येत होता, तसतशी गर्मी वाढत होती. गाडीतील लहान मुले गर्मीमुळे बेचैन झाली होती. प्रवाशांना गाडीतील एसी मॅकेनिककडून पुढच्या स्टेशनवर एसी सुरळीत होईल, असे सांगण्यात आले. दुपारी ३ वाजता बल्लारशा स्टेशन आले तरीही काहीच झाले नाही. प्रवाशांचा संयमाचा बांध फुटला आणि त्यांनी गाडीत गोंधळ घालणे सुरू केले. शेवटी ही गाडी नागपूर रेल्वेस्थानकावर सायंकाळी ६.१५ वाजता पोहचली. प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक लक्षात घेऊन, रेल्वे प्रशासनाने ताबडतोब गाडीला नवीन एसी कोच लावला. प्रवाशांचे समाधान झाल्यानंतर ६.३५ ला गाडीला पुढच्या प्रवासासाठी रवाना करण्यात आले. एसी बंद असल्यामुळे या ४२ प्रवाशांना झालेल्या मनस्तापाची नुकसानभरपाई म्हणून प्रवाशांना रिफंड सर्टिफिकेट देण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Passengers of AC coach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.