महासंघाचे पगारात भागवा अभियान!
By Admin | Updated: July 16, 2015 02:59 IST2015-07-16T02:59:15+5:302015-07-16T02:59:15+5:30
पगार, भत्ते व पदोन्नती अशा रास्त मागण्यांचा पाठपुरावा करतानाच बहुसंख्य अधिकारी कार्यालयीन कामकाजही तितक्याच तत्परतेने करतात.

महासंघाचे पगारात भागवा अभियान!
राजपत्रित अधिकारी महासंघ : भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाचा संकल्प
नागपूर : पगार, भत्ते व पदोन्नती अशा रास्त मागण्यांचा पाठपुरावा करतानाच बहुसंख्य अधिकारी कार्यालयीन कामकाजही तितक्याच तत्परतेने करतात. असे असतानाही जनमानसात अधिकाऱ्याविषयी नकारात्मक भावना आहे.
याचाच अर्थ कार्यपद्धती सदोष असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अधिकाऱ्यात बदल घडावा व सर्वसामान्यांची कामे तातडीने मार्गी लागावी,यासाठी पगारात भागवा अभियान राबविण्याचा संकल्प महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने बुधवारी बैठकीत केला.
सर्वसामान्यांना लहानसहान कामासाठी शासकीय कार्यालयात हेलपाटे घालावे लागतात. काहीतरी दिल्याशिवाय काम होत नाही, अशी जनमानसाची धारणा झालेली आहे. ही भावना दूर करणे आवश्यक आहे. हे विचारात घेता शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी आणि प्रशासनात पारदर्शकता व लोकाभिमुख ठेवण्यासाठी अधिकारी कर्तव्यदक्ष असल्याची प्रचिती लोकांना यावी.
असे काम करणारे अधिकारी प्रशंसा मिळवतात. त्यामुळे अधिकाऱ्यांची चांगली प्रतिमा निर्माण करण्यासाठी पगारात भागवा अभियान राबविण्याचा संकल्प केल्याची माहिती महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार ग.दि.कुलथे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अध्यक्ष मनोहर पोकळे, सरचिटणीस समीर भाटकर, उपाध्यक्ष डॉ. प्रमोद रक्षमवार, डॉ. कमल किशोर फुटाणे,डॉ. संदीप इंगळे, किशोर मिश्रीकोटकर, विवेक बोंदरे, लघुलेखक संघटनेचे सोहन चवरे आदी उपस्थित होते.
काही विभागातील अधिकाऱ्यांना रंगेहात लाच घेताना पकडल्याच्या घटना निदर्शनास येतात. यामुळे जनमानसात अधिकाऱ्यांची प्रतिमा मलिन होते. अभियानामुळे याला आळा बसेल. पगारात भागवा म्हणजे पैशाचा हव्यास टाळावा. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समाजसुधारकांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सहाव्या वेतन आयोगामुळे चांगले जीवन जगण्यासाठी पुरेसे वेतन मिळते. त्यामुळे वेतन कमी आहे, अशी तक्रार करू शकत नाही. तसेच सातवा वेतन आयोग लागू व्हावा, यासाठी महासंघ संघर्ष करीत आहे. अशा परिस्थितीत गैरव्यवहार करणाऱ्या अधिकाऱ्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी महासंघ करेल, अशी माहिती कुलथे यांनी दिली. (प्रतिनिधी)