विद्यार्थ्यांचे बँकेत खाते उघडण्यासाठी पालकांची धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:08 AM2021-09-27T04:08:15+5:302021-09-27T04:08:15+5:30
नागपूर : शिक्षण विभागाने प्रत्येक विद्यार्थ्याचे बँक खाते काढावे, असे निर्देश शाळांना दिले आणि शाळांनी बँकेच्या खात्यासाठी पालकांकडे ...
नागपूर : शिक्षण विभागाने प्रत्येक विद्यार्थ्याचे बँक खाते काढावे, असे निर्देश शाळांना दिले आणि शाळांनी बँकेच्या खात्यासाठी पालकांकडे तगादा लावला. शहरातील बँकांमध्ये विद्यार्थ्यांचे बँक खाते काढण्यासाठी पालक व विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. अनेक बँकांमध्ये विद्यार्थ्यांचे खाते काढण्यासाठी सहकार्य मिळत नाही. त्यामुळे पालकांची चांगलीच धावपळ होत आहे.
शासन उन्हाळी सुटीतील शालेय पोषण आहाराचा निधी विद्यार्थ्यांच्या खात्यावर वळता करणार आहे. शिवाय शिष्यवृत्ती देखील विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांचे खाते काढण्यासाठी शाळा स्तरावर सूचना दिल्या आहे. शहरातील शाळा अजूनही सुरू झाल्या नाही. तर ग्रामीण भागात ८ ते १२ पर्यंत शाळा सुरू झाल्या आहेत. पहिली ते आठव्या वर्गाच्या विद्यार्थ्यांचे बँक खाते काढायचे आहे. शाळांचे शिक्षक वारंवार बैठका घेऊन, ऑनलाइनच्या माध्यमातून पालकांना बँक खाते काढण्यासाठी तगादा लावत आहे. तिकडे बँकेत १० वर्षांखालील विद्यार्थ्यांचे बँक खाते काढण्यास नकार देत आहे. काही बँका तर विद्यार्थ्यांचे खाते काढण्यासाठीच नकार देत आहेत. तुम्ही राहता त्याच भागातील बँकेत खाते काढा, असे उत्तर पालकांना मिळत आहे. खाते काढण्यासाठी कागदपत्रांची धावपळ, राष्ट्रीयीकृत बँकेतील इंग्रजीतील खाते काढण्याचा फॉर्म बघून अशिक्षित पालकांना चांगलाच त्रागा करावा लागतो आहे. पोषण आहाराचे १५० ते २०० रुपयांच्या अनुदानासाठी १००० रुपयांचा खर्च पालकांना खाते काढण्यासाठी करावा लागतो आहे.
- जिल्ह्यात पहिली ते आठवीचे विद्यार्थी
जिल्ह्यातील शाळा - ३६३४
विद्यार्थी संख्या - ६,७०,५४२
- या योजनांच्या लाभासाठी बँक खाते आवश्यक
१) उन्हाळी सुटीतील पोषण आहाराचे पैसे थेट खात्यात जमा होणार आहेत.
२) शिष्यवृत्ती तसेच इतर योजनांचे पैसे जमा करण्यास बँकेत खाते गरजेचे आहे.
- शिक्षण विभागाकडे आकडेवारीच नाही
शिक्षण विभागाने शाळांना खाते उघडण्यासाठी सूचना केल्या आहेत; परंतु आतापर्यंत किती विद्यार्थ्यांनी बँकेत खाते उघडले याचा आढावा अथवा माहिती शिक्षण विभागाने घेतली नाही.
- पालकांचाही प्रतिसाद अत्यल्प
पालकांचाही बँकेत खाते काढण्यासाठी अल्प प्रतिसाद आहे. १५० रुपयांसाठी हजार रुपये खर्च करावे लागत असल्याने, सोबतच कागदपत्र गोळा करणे, बँकेच्या गर्दीत उभे राहणे, इंग्रजीतील भलामोठा बँकेचा फॉर्म, बँकांकडून अडवणूक, टाळाटाळ यामुळे पालकांचा बँक खाते काढण्याला प्रतिसाद अत्यल्प आहे.