Parents Make Girls 'Dashing': Babita Fogat | पालकांनो मुलींना ‘धाकड’ बनवा : महिला मल्ल बबिता फोगाटचे आवाहन
पालकांनो मुलींना ‘धाकड’ बनवा : महिला मल्ल बबिता फोगाटचे आवाहन

ठळक मुद्देखासदार क्रीडा महोत्सवाला दिमाखदार सोहळ्याद्वारे प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लेझर शो, चित्तवेधक मल्लखांब प्रात्यक्षिके, राजस्थानी नृत्याची मेजवानी तसेच योगासने आणि फायर रिंगशो आदींच्या थरारक सादरीकरणासह खासदार क्रीडा महोत्सवाच्या तिसऱ्या पर्वाचे रविवारी यशवंत स्टेडियम येथे दिमाखदार उद्घाटन झाले. यावेळी सिनेअभिनेता आणि खा. सन्नी देओल, अभिनेते शरद केळकर, आंतरराष्ट्रीय महिला मल्ल बबिता फोगाट तसेच त्यांचे पती मल्ल विवेक सुहाग हे दोन तास चाललेल्या समारंभाचे मुख्य आकर्षण होते.
व्यासपीठावर राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार, महोत्सवाची संकल्पना मांडणारे खा. आणि केंद्रीय रस्ते ेविकासमंत्री नितीन गडकरी, खा. डॉ. विकास महात्मे, आ. विकास कुंभारे, आ. कृष्णा खोपडे, आ. परिणय फुके, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी आ. सुधाकर देशमुख, डॉ. मिलिंद माने, माजी मंत्री सुलेखा कुंभारे, उपमहापौर मनिषा कोठे, माजी महापौर प्रवीण दटके यांची उपस्थिती होती. समारंभाच्या अध्यक्षस्थानी महोत्सवाचे संयोजक आणि महापौर संदीप जोशी होते. पालकांना आवाहन करीत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची सुवर्ण विजेती मल्ल बबिताने मुलींना धाकड(मजबूत) बनविण्याचे आवाहन केले. मुलींमध्ये कमालीची ऊर्जा असल्याचे सांगून पालकांनी मुलींच्या पाठीशी उभे राहून त्यांना सतत प्रोत्साहन द्यावे असे सांगितले. शिक्षणाइतकेच खेळाला देखील महत्त्व मिळावे, खेळाडूंमध्ये सकारात्मकवृत्तीचा संचार होण्यासाठी खेळ आवश्यक असल्याचे सांगून बबिताने ‘हार को गले नही लगाना, और जित को सिर पे मत बिठाना,’ असा सल्ला खेळाडूंना दिला. बबिता यांनी नागपूरचा विकास पाहून आपले डोळे दिपल्याचे सांगून मोठे रस्ते, पूल, मेट्रो आणि, शहरातील हिरवळ या सोयी निर्माण करण्याचे श्रेय नितीन गडकरी यांना जाते, अशा शब्दात गडकरी यांचा गौरव केला.
सन्नी देओल यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना जय- पराजय खेळाचा भाग आहे. तंदुरुस्ती आणि सकारात्मक ऊर्जेसाठी खेळाची गरज आहे. नियमांचा सन्मान करून मैदान गाजवा. खेळाडूवृत्ती राखूनच खेळात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. स्वत: शारीरिक शिक्षणाचे विद्यार्थी राहिलेले सिनेअभिनेते शरद केळकर यांनी नागपुरात इतक्या मोठ्या संख्येने खेळाडू खेळत असल्याचा आनंद झाल्याचे सांगितले.
राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार यांनी युवा लोकांनी फेसबुक आणि मोबाईलमध्ये अडकून न पडता शारीरिक तंदुरुस्तीसाठी किमान एकतरी खेळ खेळावा, असे आवाहन केले. क्रीडामंत्री या नात्याने युवा शक्तीला मैदानावर आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.
गडकरी यांनी खेलो इंडिया सारखी संकल्पना नागपुरात राबविण्यासाठी ‘खेलो नागपूर’अंतर्गत क्रीडा महोत्सवाला चालना देण्याचा हेतू असल्याचे सांगितले. नागपुरातून देशाला सुवर्ण विजेते खेळाडू मिळावेत असा यामागे मानस असल्याचे त्यांनी सांगितले. शहरात कुणालाही खेळण्यासाठी जागा मिळावी या दृष्टिकोनातून अनेक स्टेडियम्स विकसित करण्यात येत असल्याची त्यांनी माहिती दिली.
प्रारंभी स्पर्धेचा ध्वज नागपूरचे विश्व चॅम्पियन कॅरमपटू इर्शाद अहमद यांनी फडकवला. पाहुण्यांच्याहस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित झाल्यानंतर बबिता फोगाट यांनी सर्व खेळाडूंना शपथ दिली.
प्रास्ताविक महापौर संदीप जोशी यांनी केले. १३ दिवस चालणाऱ्या या क्रीडा महोत्सवात ३१ क्रीडा प्रकारात ३८ हजार खेळाडू सहभागी होणार असून सांघिक आणि वैयक्तिक प्रकारात एकूण ७२३७ सामने खेळविले जातील.एकूण ७८ लाख रूपयांची रोख बक्षिसे तसेच ४२६ चषक आणि ४३५० मेडल्स खेळाडूंना वितरित करण्यात येणार असल्याचे जोशी यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन आरजे राजन यांनी केले.

सन्नी देओल यांना चाहत्यांची भरभरुन दाद...
खासदार क्रीडा महोत्सवाचे मुख्य आकर्षण असलेले खा. सन्नी देओल यांनी रविवारी यशवंत स्टेडियमवर चाहत्यांना जिंकले. आपल्या प्रसिद्ध संवादफेकीतून त्यांनी चाहत्यांची इच्छा पूर्ण केली. छोटेखानी भाषणादरम्यान सन्नी देओल यांनी युवा खेळाडूंना मार्गदर्शन केले शिवाय अनेक हिट चित्रपटातून सामाजिक संदेश देणाऱ्या या ज्येष्ठ अभिनेत्याने ढाई किलो का हात जब पडता है ना, तो आदमी उठता नही उठ जाता है,’ असे सांगताच एकच जल्लोष झाला. यावर सन्नी यांनी प्रत्येक नागरिकाने राष्ट्र रक्षणासाठी निर्भिड झाले पाहिजे असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी झिरो माईल ग्रूपने सिनेसंगीताची मेजवानी सादर केली. नागपूरच्या प्रगतीचा आणि विकासाचा आलेख मांडणारा छोटेखानी लेझर शो यावेळी सादर करण्यात आला. न्यू इंग्लिश हायस्कूल काँग्रेसनगर शाळेच्या ५० विद्यार्थ्यांच्या समूहाने आकर्षक मल्लखांब प्रात्यक्षिके सादर केली, त्यावेळी पाहुण्यांनी टाळ्या वाजवून मल्लखांबपटूंच्या कौशल्याला दाद दिली. एसओएस स्कूल अत्रे ले-आऊट येथील विद्यार्थ्यांनी राजस्थानी नृत्य सादर केले. रंगीबिरंगी पेहरावात आलेली ही मुले उपस्थितांचे आकर्षण ठरली. अमित योगा क्लबच्या विद्यार्थ्यांनी योगासनाचे प्रात्यक्षिक सादर करीत देशभक्तीचे स्फुलिंग चेतवले. पाठोपाठ छावा क्रीडा सांस्कृतिक मंडळातर्फे विद्यार्थ्यांनी फायररिंग शो सादर केला. राष्ट्रगीताने समारंभाची सांगता झाली.

Web Title: Parents Make Girls 'Dashing': Babita Fogat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.