पालकांनो सावधान ! मुलांकडे वाहतूक परवाना आहे ना ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 20:53 IST2018-01-31T20:44:58+5:302018-01-31T20:53:19+5:30
उपराजधानीत वाहनचालकांकडून वाहतूक नियम मोडण्याचे प्रमाण वाढले असून अनेक शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी तर बेदरकारपणे वाहने दामटताना दिसून येतात. मात्र असे प्रकार आता मुलांच्या पालकांची डोकेदुखी वाढविणारे ठरणार आहेत.

पालकांनो सावधान ! मुलांकडे वाहतूक परवाना आहे ना ?
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीत वाहनचालकांकडून वाहतूक नियम मोडण्याचे प्रमाण वाढले असून अनेक शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी तर बेदरकारपणे वाहने दामटताना दिसून येतात. मात्र असे प्रकार आता मुलांच्या पालकांची डोकेदुखी वाढविणारे ठरणार आहेत. मागील वर्षी वाहतूक विभागाने अशा विद्यार्थ्यांविरोधात तीन दिवस विशेष मोहीम राबविली होती. यात सुमारे तीन हजार विद्यार्थी पोलिसांच्या सापळ्यात अडकले, तर मुलांनी केलेल्या नियमभंगासाठी सहाशेहून अधिक पालकांना कारवाईला सामोरे जावे लागले. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत नागपूर शहर पोलिसांच्या वाहतूक विभागाकडे विचारणा केली होती. २०१७ मध्ये नियम तोडणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाईसाठी मोहीम राबविण्यात आली होती का, किती विद्यार्थ्यांवर कारवाई झाली व पालकांना काही दंड झाला का, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार २०१७ मध्ये २६ जुलै ते २८ जुलै या तीन दिवसांच्या कालावधीत वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबविली होती. या मोहिमेदरम्यान २,९४२ विद्यार्थ्यांवर नियम न पाळल्याबद्दल कारवाई करण्यात आली. तर मुलांनी नियम तोडल्याबद्दल ६२६ पालक किंवा वाहनमालकांवर कारवाई करण्यात आली. या कालावधीत १,१९२ वाहने ताब्यातदेखील घेण्यात आली. सर्वाधिक कारवाई ही वाहतूक पोलिसांच्या ‘चेंबर-२’द्वारे करण्यात आली. त्यांनी ८३८ विद्यार्थ्यांवर तसेच २३२ पालकांवर कारवाई केली. तर ४९४ वाहने ताब्यात घेतली.
तीन दिवसांची कारवाई, कितपत प्रभावी ?
दरम्यान, नागपूर शहरात अनेक विद्यार्थी परवान्याशिवायच वाहने चालविताना दिसून येतात. शिवाय ‘ट्रीपल सीट’, सिग्नल तोडणे, गाडी चालविताना मोबाईलवर बोलणे, अतिवेग इत्यादी प्रकारे वाहतुकींच्या नियमांचा भंग करण्यात येतो. मागील वर्षी तीन दिवस कारवाई चालली. मात्र जर विद्यार्थी व पालकांमध्ये शिस्त आणायची असेल तर कारवाईचे प्रमाण वाढविण्याची गरज असून अशी विशेष मोहीम नियमितपणे राबविली गेली पाहिजे, असे मत अभय कोलारकर यांनी व्यक्त केले.