रेल्वे स्टेशनवर बॉम्बच्या अफवेने दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:26 IST2020-12-16T04:26:45+5:302020-12-16T04:26:45+5:30
बेवारस बॅगमुळे सुरक्षा यंत्रणेची धावपळ : परिसर केला सील लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर रेल्वे स्टेशनवर मंगळवारी सकाळी ...

रेल्वे स्टेशनवर बॉम्बच्या अफवेने दहशत
बेवारस बॅगमुळे सुरक्षा यंत्रणेची धावपळ : परिसर केला सील
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर रेल्वे स्टेशनवर मंगळवारी सकाळी बेवारस बॅग आढळून आल्याने सुरक्षा यंत्रणेत खळबळ उडाली. बॉम्बच्या अफवेमुळे परिसर सील करण्यात आला. बॉम्ब निरोधक पथक व डॉग स्क्वॉड पथकाने ४५ मिनिटे तपासणी केली. बॅगमध्ये कोणत्याही प्रकारची स्फोटके नसल्याचे निष्पन्न झाल्यावर सुरक्षा यंत्रणेने सुटकेचा श्वास सोडला.
बॅग जीआरपीच्या जवानांनी पोलीस ठाण्यात आणून तपासली असता ती महिला प्रवाशाची असल्याचे निदर्शनास आले. घाईगडबडीत बॅग स्टेशनवर विसरली. पोलिसांनी बॅग महिलेला परत केली. असा बेजाबाबदारपणा पुन्हा करू नका अशी तंबी या महिलेला दिली. ही कारवाई एपीआय शेख, हेड कॉन्स्टेबल रवींद्र बांते, कॉन्स्टेबल मनोज बोराडे, नीरज पाटील, राहुल सेलोटे व राजेश पंडित आदींनी केली.
मागील काही दिवसात रेल्वे प्रवाशांची संख्या वाढली आहे. नागपूर रेल्वे स्टेशन आधीच संवेदनशील स्टेशनच्या यादीत आहे. यामुळे येथे विशेष खबरदारी घेतली जात आहे. कोणत्याही प्रकारची बेवारस वस्तू आढळून आल्यास ती तपासली जाते. असाच प्रकार मंगळवारी घडला.
स्टेशनच्या पश्चिम गेटजवळ ओला टॅॅक्सी स्टँड जवळ एक काळ्या रंगाची बेवारस बॅग आढळून आली. परिसरात प्रवाशांची प्रतीक्षा करीत असलेले कुली अब्दुल मज्जीद याचे याकडे लक्ष गेले. स्टेशनवरील ऑटो चालक व कर्मचाऱ्यांनी सुरक्षा यंत्रणेला याची माहिती दिली. थोड्याच वेळात बॉम्ब निरोधक पथकाला पाचारण करण्यात आले. परिसर सील करण्यात आला. सुदैवाने बॅगमध्ये कुठल्याही प्रकारचे स्फोटके नसल्याचे आढळून आले. या बॅगमध्ये कपडे होते.