बहीण, मुलासह पाच जणांची हत्या करणारा क्रूरकर्मा पालटकरचा दोष सिद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2023 20:55 IST2023-04-01T20:55:15+5:302023-04-01T20:55:42+5:30
Nagpur News अंगात सैतान संचारल्यागत स्वत:चा मुलगा, बहीण आणि तिच्या परिवारातील पाच जणांची अत्यंत क्रूरपणे हत्या करणारा क्रूरकर्मा विवेक गुलाब पालटकर (वय ४२) याचा गुन्हा न्यायालयात सिद्ध झाला. त्यामुळे न्यायालयाने त्याला शनिवारी दोषी ठरविले.

बहीण, मुलासह पाच जणांची हत्या करणारा क्रूरकर्मा पालटकरचा दोष सिद्ध
नागपूर : अंगात सैतान संचारल्यागत स्वत:चा मुलगा, बहीण आणि तिच्या परिवारातील पाच जणांची अत्यंत क्रूरपणे हत्या करणारा क्रूरकर्मा विवेक गुलाब पालटकर (वय ४२) याचा गुन्हा न्यायालयात सिद्ध झाला. त्यामुळे न्यायालयाने त्याला शनिवारी दोषी ठरविले. त्याला कोणती शिक्षा द्यायची, त्यावर ११ एप्रिलला निर्णय होणार आहे. सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. एस. पावसकर यांच्यासमक्ष या बहुचर्चित प्रकरणाची सुनावणी झाली.
११ जूनच्या पहाटे आरोपी पालटकरने त्याची सख्खी बहीण अर्चना कमलाकर पवनकर (वय ४५), तिचे पती कमलाकर मोतीराम पवनकर (वय ४८), अर्चनाची मुलगी वेदांती (वय १२) यांची हत्या केली. पवनकर कुटुंब दिघोरीतील आराधनानगर येथे राहत होते. कमलाकर हे प्रॉपर्टी डीलर होते. तसेच ते घरीच वैष्णवी इलेक्ट्रिकल्स नावाने दुकान चालवत होते. आरोपी विवेकला पत्नीची हत्या केल्याच्या आरोपात जन्मठेपेची शिक्षा झाली होती. त्याला न्यायालयातून सोडविण्यासाठी कमलाकर यांचे सुमारे पाच लाख रुपये खर्च झाले होते. त्यामुळे कमलाकर आरोपीकडे पैसे मागत होते. आरोपी त्याच्याकडे नवरगाव येथे वडिलोपार्जित दहा एकर शेती असतानाही पैसे परत करत नव्हता. त्यावरून दोघांमध्ये घटनेच्या दोन महिन्यांपूर्वीपासून वाद सुरू होता. त्यातून आरोपीने ११ जून २०१८ रोजी पहाटेच्या सुमारास संबंधित पाचही जणांचा निर्घृण खून केला. या घटनेच्या वेळी आरोपीची मुलगी वैष्णवी (१२) व कमलाकर यांची मुलगी मिताली (१४) या दोघीही घरात होत्या. त्या सुदैवाने बचावल्या.
न्यायालयात या खटल्याचे कामकाज सरकारतर्फे ॲड. अभय जिकार, फिर्यादी केशव पवनकरतर्फे ॲड. मो. अतिक तर, आरोपीतर्फे ॲड. ऋषिकेश ढाले यांनी पाहिले. जिकार यांनी क्रूरकर्मा आरोपीविरुद्ध २९ साक्षीदार तपासले. याशिवाय त्यांनी अन्य विविध पुराव्यांच्या आधारावर आरोपीवरील गुन्हे सिद्ध केले.
आधी त्यांचेच अन्न खाल्ले अन् नंतर रक्त सांडले
विवेकने कमलाकर व त्यांच्या कुटुंबियांचा कायमस्वरूपी काटा काढण्याचा कट आखला होता. त्यानुसार, तो रात्री दहा वाजण्याच्या सुमारास कमलाकर यांच्या घरी गेला. त्याने बहीण, जावई यांच्यासोबत बसून जेवण केले. नंतर हॉलमध्ये विवेक व मीराबाई झोपल्या. बेडरुममध्ये कमलाकर, अर्चना, वेदांती व कृष्णा हे झोपले. मध्यरात्रीनंतर आरोपी विवेक उठला. त्याने सैतानासारखे कमलाकर, अर्चना, वेदांती व कृष्णा यांच्या डोक्यावर लोखंडी जड वस्तूने जबर वार केला. त्यामुळे चौघेही बेडवरच ठार झाले. त्यांचा आवाज ऐकून मीराबाई बेडरुमकडे आल्या. विवेकने मीराबाईला पकडून स्वयंपाकघरात नेले व त्यांच्याही डोक्यावर वार करून ठार मारले होते. या हत्याकांडामुळे उपराजधानीत त्यावेळी प्रचंड थरार निर्माण झाला होता.
--------------------