पामतेलाची आयात थांबली; साेयाबीन, माेहरीचे दर वधारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2022 13:45 IST2022-04-26T13:24:17+5:302022-04-26T13:45:20+5:30
साेयाबीनवरील स्टाॅक लिमिट व ढेपेची आयात आणि माेहरीच्या वायद्यावरील बंदीमुळे दाेन्ही तेलबियांचे दर उतरले हाेते.

पामतेलाची आयात थांबली; साेयाबीन, माेहरीचे दर वधारणार
सुनील चरपे
नागपूर : देशात खाद्यतेलाची मागणी १२ ते १६ टक्क्यांनी वाढली असताना साेयाबीन, माेहरीसह इतर तेलबियांचे उत्पादन २५ ते ३४ टक्क्यांनी घटले आहे. देशांतर्गत खाद्यतेलाची गरज पूर्ण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या पामतेलावर इंडाेनेशियाने निर्यातबंदी लावली. त्यामुळे पामतेलाची आयात बंद झाल्याने देशांतर्गत बाजारातील साेयाबीन व माेहरीचे दर वधारण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मागील काही वर्षांपासून साेयाबीन व इतर तेलबियांच्या उत्पादनात घट येत आहे. सन २०२१-२२ च्या हंगामात माेहरीचे १२७ लाख टन तर साेयाबीनचे १०८ टन उत्पादन हाेण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला हाेता. वास्तवात, माेहरीचे १०५ लाख टन आणि साेयाबीनचे ९७ लाख टन उत्पादन झाले. सूर्यफूल, भुईमूग व इतर तेलबियांचे उत्पादन तुलनेत फारच कमी आहे. हे उत्पादन देशांतर्गत खाद्यतेलाची गरज भागविण्यासाठी बरेच कमी आहे.
सन २०२०-२१ च्या हंगामात साेयाबीनच्या दराने ११ हजारी तर माेहरीच्या दराने ९ हजारी गाठली हाेती. साेयाबीनवरील स्टाॅक लिमिट व ढेपेची आयात आणि माेहरीच्या वायद्यावरील बंदीमुळे दाेन्ही तेलबियांचे दर उतरले हाेते.
सन २०२१-२२ च्या हंगामात साेयाबीन व माेहरीच्या उत्पादनात माेठी घट झाली असून, खाद्यतेलाचा वापर व मागणी वाढली आहे. त्यामुळे या दाेन्हीसह इतर तेलबियांचे दर वाढण्याची शक्यता केंद्र सरकारच्या हस्तक्षेपामुळे मावळली हाेती. सध्या माेहरीला प्रति क्विंटल ५,२०० ते ६,५०० आणि साेयाबीनला ६,००० ते ७,७०० रुपये दर मिळत आहे. त्यातच इंडाेनेशियाने पामतेल निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याने या दाेन्ही तेलबियांचे दर वधारण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांकडे विकायला साेयाबीन नसल्याने त्यांना या दरवाढीचा फायदा मिळणार नाही, असेही तज्ज्ञांनी सांगितले.
७० टक्के पामतेलाची आयात
भारताला खाद्यतेलाची गरज पूर्ण करण्यासाठी ५५ ते ५७ टक्के खाद्यतेलाची आयात करावी लागते. यात किमान ६२ टक्के पामतेल, २५ टक्के साेयाबीन, १० टक्के सूर्यफूल व ३ टक्के इतर तेलाची आयात केली जाते. भारतात ६० टक्के पामतेल इंडाेनेशिया तर ४० टक्के मलेशियातून आयात केले जाते.
खाद्यतेलाचा वाढता वापर
भारतात प्रति व्यक्ती वर्षाकाठी १२ किलाे खाद्यतेल खाण्याची शिफारस भारतीय आयुर्विज्ञान संशाेधन परिषदेने केली असली तरी प्रति व्यक्ती १८ किलाे खाद्यतेल सेवन केले जाते. खाद्यतेलाचा वापर वाढल्याने ही गरज पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने प्रत्येक रिफाईंड ऑईलमध्ये ३८ ते ४० टक्के पामतेल मिसळण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे देशात पामतेलाचा वापर वाढला आहे.