धान खरेदीचे चुकारे रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:19 IST2021-01-13T04:19:42+5:302021-01-13T04:19:42+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : तालुक्यात सध्या फेडरेशनकडून खरेदी-विक्री संघामार्फत धानाची खरेदी सुरू आहे. परंतु गेल्या महिनाभरापासून शासनाकडून चुकारे ...

Paddy purchase errors stalled | धान खरेदीचे चुकारे रखडले

धान खरेदीचे चुकारे रखडले

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : तालुक्यात सध्या फेडरेशनकडून खरेदी-विक्री संघामार्फत धानाची खरेदी सुरू आहे. परंतु गेल्या महिनाभरापासून शासनाकडून चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. दुसरीकडे, मागील चार दिवसांपासून बारदाना संपल्यामुळे खरेदी केंद्र बंद आहे.

रामटेक येथील खरेदी-विक्री संघामार्फत शासकीय धान खरेदी सुरू आहे. आतापर्यंत ३३६ शेतकऱ्यांकडील १६,६९९ क्विंटल धान खरेदी करण्यात आला. त्याची एकूण किंमत ३ काेटी ११ लाख ९३,७३२ रुपये हाेते. यामध्ये १४ डिसेंबर २०२० पर्यंत केवळ ९० शेतकऱ्यांचे ४,५०० रुपये क्विंटलप्रमाणे ८४ लाख ६०० रुपये अदा केले. अद्यापही २४६ शेतकऱ्यांचे २ काेटी २७ लाख ८७,७३२ रुपये शासनाकडे थकीत आहेत.

शासनाने धानाची आधारभूत किंमत १,८६८ रुपये जाहीर केली असून, प्रतिक्विंटल ७०० रुपये बाेनस जाहीर केला आहे. त्यामुळे धान विक्रीसाठी शासकीय खरेदी केंद्राकडे शेतकऱ्याचा कल वाढला आहे. व्यापारी कमी दरात धान खरेदी करतात. शिवाय चुकाऱ्यासाठी त्यांच्याकडे हेलपाटे मारावे लागतात. इकडे मात्र चुकारे मिळण्याची शाश्वती असल्याने शेतकरी शासकीय केंद्रावर धान विक्री करतात. परंतु येथेही चुकारे वेळेवर मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

महाराष्ट्र स्टेट काे-मार्केटिंग फेडरेशनकडून धान खरेदी करताना त्यांच्यामार्फत बारदाना पुरविला जाताे. गेल्या तीन दिवसांपासून बारदाना संपल्याने रामटेकचे खरेदी केंद्र बंद पडले आहे. शेतकऱ्यांना धान विक्रीसाठी आणू नये, असे सांगण्यात आले. त्यामुळे विक्रीविना धान घरी पडला आहे. परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने धानाचे चुकारे त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे तसेच बारदाना उपलब्ध करून खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांची आहे.

Web Title: Paddy purchase errors stalled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.