अल्प मोबदला मिळालेल्या शेतकऱ्यांना पॅकेज
By Admin | Updated: December 23, 2014 00:38 IST2014-12-23T00:38:57+5:302014-12-23T00:38:57+5:30
मिहान प्रकल्पासंदर्भात सरकार सकारात्मक आहे. नाममात्र मोबदला मिळालेल्या शेतकऱ्यांना विशेष पॅकेज देण्याचा सरकारचा विचार असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील

अल्प मोबदला मिळालेल्या शेतकऱ्यांना पॅकेज
नागपूर : मिहान प्रकल्पासंदर्भात सरकार सकारात्मक आहे. नाममात्र मोबदला मिळालेल्या शेतकऱ्यांना विशेष पॅकेज देण्याचा सरकारचा विचार असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सोमवारी विधान परिषदेत लक्षवेधीच्या उत्तरात दिली. नीलम गोऱ्हे यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता.
ज्या शेतकऱ्यांना कमी मोबदला मिळालेला आहे, त्यांना अतिरिक्त लाभ देण्याचे विचाराधीन आहे. पुनर्वसनासंदर्भात १५ दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येईल. तसेच आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पातील दुसऱ्या धावपट्टीकरिता संरक्षण विभागाकडून वर्ग करावयाच्या २७८ हेक्टर जमीन हस्तांतरणाची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. मिहान प्रकल्पातील विशेष आर्थिक क्षेत्रात ५५ कंपन्यांना ५०९ हेक्टर क्षेत्राचे वाटप करण्यात आले आहे. संलग्न क्षेत्रात १७ कंपन्यांना १४६ हेक्टर जमिनीचे वाटप केले आहे.
तसेच सेंट्रल फॅसिलिटी बिल्डिंगमध्ये सात कंपन्यांना जागा उपलब्ध करण्यात आली आहे. विशेष आर्थिक क्षेत्रात नऊ कंपन्यांनी उत्पादनाला सुरुवात केली आहे. या प्रकल्पात आजवर १९३२ कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे.हा प्रकल्प युद्धपातळीवर कार्यान्वित करण्याचे प्रयत्न सुरू आहे. पुनर्वसनासाठी आवश्यक विकास कामे हाती घेण्यात आली आहेत. प्रकल्पाच्या विकासाकरिता शासनाने भूसंपादन व प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी ७७१ कोटी वितरित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.(प्रतिनिधी)