पाचपावली रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट उभारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:07 IST2021-04-19T04:07:19+5:302021-04-19T04:07:19+5:30
अखेर ११० खाटांच्या कोविड रुग्णांवर उपचार होणार लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वर्षभरापूर्वी अपग्रेड करण्यात आलेल्या महापालिकेच्या पाचपावली ...

पाचपावली रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट उभारणार
अखेर ११० खाटांच्या कोविड रुग्णांवर उपचार होणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वर्षभरापूर्वी अपग्रेड करण्यात आलेल्या महापालिकेच्या पाचपावली सूतिकागृह येथे अखेर कोविड रुग्णांसाठी ११० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. येथील रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी मनपा सहा किलोलीटरचा ऑक्सिजन प्लांट उभारत आहे.
महापौर दयाशंकर तिवारी यांनी रविवारी पाचपावली सूतिकागृह रुग्णालयाची पाहणी केली. ऑक्सिजनची व्यवस्था असलेले ७० बेड्सचे रुग्णालय सोमवारपासून जनतेच्या सेवेसाठी सुरू होईल. येथील बेडची संख्या ११० बेड्सपर्यंत नेली जाणार आहे. सध्या येथे सुरू असलेले लसीकरण केंद्र बाळाभाऊ पेठ येथील मनपा शाळेच्या इमारतीमध्ये हलविण्यात येईल. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात मनपाची चमू या कामात लागली असल्याचेही त्यांनी सांगितले.
सध्या नागपूरमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा असून या रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येत आहे. लिक्विड ऑक्सिजनचे गॅसमध्ये परिवर्तन करून रुग्णांना दिला जाईल. या रुग्णालयाची व्यवस्था स्वयंसेवी संस्था अशरफी फाउंडेशन यांना देण्यात आली आहे. डॉक्टर्स, फिजिशियनसुद्धा येथे राहणार असल्याची माहिती महापौरांनी दिली.
यावेळी उपायुक्त मिलिंद मेश्राम, झोनल आरोग्य अधिकारी डॉ. दीपांकार भिवगडे आणि रुग्णालयातील डॉक्टर्स उपस्थित होते. वास्तविक, वेळीच नियोजन केले असते तर
याआधीच या रुग्णालयात कोविड रुग्णांवर उपचार सुरू झाले असते.