ओव्हरलोडवरील कारवाईचे टार्गेट दुप्पट

By Admin | Updated: July 29, 2015 02:56 IST2015-07-29T02:56:46+5:302015-07-29T02:56:46+5:30

क्षमतेपेक्षा जास्त मालवाहतूक करणाऱ्या वाहनांवरील कारवाईला गती देण्यासाठी प्रत्येक प्रादेशिक परिवहन कार्यालयाला ..

Overload operation action doubles | ओव्हरलोडवरील कारवाईचे टार्गेट दुप्पट

ओव्हरलोडवरील कारवाईचे टार्गेट दुप्पट

परिवहन आयुक्त सेठी : फिटनेस व लायसन्स विभागात पारदर्शकता आणणार
नागपूर : क्षमतेपेक्षा जास्त मालवाहतूक करणाऱ्या वाहनांवरील कारवाईला गती देण्यासाठी प्रत्येक प्रादेशिक परिवहन कार्यालयाला (आरटीओ) दिलेले लक्ष्य (टार्गेट) दुप्पट केले आहे. सोबतच ओव्हरलोडवर आरटीओ आणि महसूल विभाग एकत्र कारवाई करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे, अशी माहिती परिवहन आयुक्त सोनिया सेठी यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दिली.
सेठी म्हणाल्या, वाळूच्या ओव्हरलोडवर आळा घालण्यासाठी वाळू उपसाच्या जागेवरच वजन करण्याची सोय करण्याचा विचार सुरू आहे. या संदर्भात प्रस्ताव तयार करून इतरही विभागाचा यात समावेश केला जाईल. राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेसाठी वाहनांना फिटनेस सर्टिफिकेट देण्याकरिता संगणकीकृत टेस्ट ट्रॅक तयार करण्याचे कार्य हाती घेण्यात आले आहे. नाशिक आरटीओ कार्यालयात प्रायोगिकस्तरावर याला सुरुवात झाली आहे. लवकरच इतरही आरटीओ कार्यालयात ‘बांधा वापरा व हस्तांतरित करा’ (बीओटी) या तत्त्वावर हा ट्रॅक सुरू होणार आहे. पुढील कार्यकाळात मोटार वाहन परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), वाहनाचे फिटनेसमध्ये पारदर्शकता व शास्त्रोक्त पद्धत आणण्याचा प्रयत्न राहणार आहे.
आरटीओमध्ये आॅनलाईन लर्निंग व्यवस्थेसह ई-गव्हर्नन्समधील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. त्याची व्याप्ती वाढवण्यासाठी आधुनिकीकरणाची गरजही त्यांनी बोलून दाखविली. तसेच आरटीओ कार्यालयात छोट्यामोठ्या कामासाठी लोकांना यावे लागते. त्याऐवजी आधुनिक तंत्राने ही कामे मार्गी लावता येऊ शकतील, असे मतही त्यांनी मांडले. (प्रतिनिधी)
आरटीओमध्येही लवकरच सेवा हमी कायदा
सरकारी काम आणि सहा महिने थांब’ या धोरणाला आळा बसण्यासाठी आरटीओमध्येही ‘सेवा हमी कायदा’ सुरू होणार आहे. सेठी म्हणाल्या, जनतेला मिळणाऱ्या सेवा या विहीत कालावधीमध्ये मिळाव्यात या उद्देशाने हे विधेयक आले आहे. या विधेयकामुळे प्रशासकीय कामांमध्ये गतिमानता, पारदर्शकता येणे अपेक्षित आहे.
मुदतीत अपॉर्इंटमेन्ट न मिळणाऱ्यांना अपार्इंटमेन्टची गरज नाही
वाहन चाचणी परीक्षेच्या अपॉर्इंटमेन्ट घेण्यासाठी तब्बल दीड महिन्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. याचा फटका मुदत संपायला आलेल्या अनेक शिकाऊ परवानाधारकांना (लर्निंग लायसन्स) बसत आहे. या प्रश्नावर सेठी म्हणाल्या, ज्यांचे लर्निंग लायसन्स संपण्याच्या मुदतीत आॅनलाईन अपार्इंटमेन्ट मिळत नाही त्यांना अपार्इंटमेन्ट घेणे आवश्यक नसल्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे.

Web Title: Overload operation action doubles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.