उपराजधानीत पडणार ९० हजारावर नवीन मतदारांची भर
By Admin | Updated: November 9, 2016 03:06 IST2016-11-09T03:06:21+5:302016-11-09T03:06:21+5:30
नेत्यांचे भाग्य बदलण्यासाठी नागपूर जिल्ह्याच्या मतदार यादीत ९० हजारावर नवीन मतदारांचा समावेश होणार आहे.

उपराजधानीत पडणार ९० हजारावर नवीन मतदारांची भर
निवडणूक : पूर्व नागपूर, कामठीतून सर्वाधिक अर्ज
नागपूर : नेत्यांचे भाग्य बदलण्यासाठी नागपूर जिल्ह्याच्या मतदार यादीत ९० हजारावर नवीन मतदारांचा समावेश होणार आहे.
मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी पूर्व नागपूर व कामठी विधानसभा मतदार क्षेत्रातून सर्वाधिक अर्ज सादर करण्यात आले आहेत. जिल्हा निवडणूक विभागाने हा खुलासा केला आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार, ‘वोटर लिस्ट समरी रिव्हिजन’च्या कालावधीमध्ये जिल्हा निवडणूक विभागाला ९० हजार ३१२ अर्ज क्र.-६ (नवीन मतदार), ५ हजार ४०३ अर्ज क्र.-८ (माहितीत सुधारणा) व १ हजार २५५ अर्ज क्र.-८-अ (स्थानांतरण) असे एकूण १ लाख ५ हजार ७८५ अर्ज प्राप्त झाले आहेत. विधानसभा मतदार क्षेत्रनिहाय आकडेवारी पाहिल्यास, मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी पूर्व नागपुरातून १४ हजार ३८, दक्षिण-पश्चिम नागपुरातून ७ हजार ४८, दक्षिण नागपुरातून ११ हजार ५००, मध्य नागपुरातून ३ हजार ८५३, पश्चिम नागपुरातून ५ हजार ८९०, उत्तर नागपुरातून ७ हजार ५४३, कामठीतून १५ हजार ८७६, रामटेकमधून ३ हजार ३३, काटोलमधून ३ हजार ९५८, सावनेरमधून ६ हजार ५०२, हिंगण्यातून ७ हजार ३७० तर, उमरेड येथून ३ हजार ५५९ अर्ज मिळाले आहेत.
जिल्हा निवडणूक विभाग सर्व अर्जांची पडताळणी करेल. यानंतर पात्र नागरिकांचा अंतिम मतदार यादीत समावेश करण्यात येईल. नवीन मतदार यादी ५ जानेवारी २०१७ रोजी प्रकाशित होईल अशी माहिती मिळाली आहे.(प्रतिनिधी)
आठ हजारावर मतदार वगळले जातील
मतदार यादीतून जुन्यापैकी ८ हजार ८१५ मतदारांना वगळले जाऊ शकते. यासाठी अर्ज क्र.-७ प्राप्त झाले आहेत. यापैकी बहुतांश मतदारांचा मृत्यू झाला असू शकतो. अर्जांची पडताळणी केल्यानंतर योग्य निर्णय घेतला जाईल.