उपराजधानीत १४५१ बेकायदा धार्मिक स्थळे
By Admin | Updated: November 8, 2016 02:48 IST2016-11-08T02:48:07+5:302016-11-08T02:48:07+5:30
राज्यातील सर्व महापालिकांच्या हद्दीत असलेली सन १९६० ते १९ सप्टेंबर २००९ या काळात बांधण्यात

उपराजधानीत १४५१ बेकायदा धार्मिक स्थळे
निष्कासित करण्याचे आदेश : मनपा प्रशासनापुढे आव्हान
नागपूर : राज्यातील सर्व महापालिकांच्या हद्दीत असलेली सन १९६० ते १९ सप्टेंबर २००९ या काळात बांधण्यात आलेली बेकायदा धार्मिक स्थळे सरकारच्यालेखी वर्ग ‘ब’मध्ये येतात. अशी धार्मिक स्थळे १७ नोव्हेंबर २०१७ पूर्वी निष्कासित करण्याचे आदेश नगरविकास विभागातर्फे महापालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. नागपूर शहरात अशी १४५१ बेकायदा धार्मिक स्थळे आहेत.
नागपूर शहरात २९ सप्टेंबर २००९ पूर्वीची १५२१ बेकायदा धार्मिक स्थळे होती. परंतु यातील ‘अ’ वर्गातील १७ धार्मिक स्थळे नियमित करण्यात आली आहेत तर ४३ धार्मिक स्थळे निष्कासित करण्यात आलेली आहेत. तसेच चार स्थळांचे स्थलांतर करण्यात आले आहे. बेकायदा धार्मिक बांधकामे हटविण्याचा आदेश हा मुंबई उच्च न्यायालयाने या आधीच दिलेल्या निर्देशांचे काटेकोर पालन करण्यासाठी देण्यात आला आहे. यात आता कोणत्याही स्वरूपाची मुदतवाढ दिली जाणार नाही. या आदेशाचे काटेकोर पालन करावयाचे आहे. या आदेशाचे पालन केले नाही तर आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना न्यायालयीन अवमानाच्या खटल्यास सामोरे जावे लागणार आहे.
नागपूर शहरातील बेकायदा धार्मिक स्थळांचे सर्वेक्षण व वर्गवारी करण्यासाठी महापालिका प्रशासनातर्फे मोहीम राबविण्यात आली होती. त्यानुसार ‘अ’ वर्गातील १७ धार्मिक स्थळे नियमित करण्यात आलेली आहेत. ‘ब’ वर्गातील ४३ स्थळे निष्कासित करण्यात आलेली असून १४५१ स्थळे अद्याप निष्कासित करावयाची आहेत. ‘क’ वर्गातील चार स्थळे स्थलांतरित करण्यात आली असून सहा स्थळांचे स्थलांतर करावयाचे आहे. परंतु बेकायदा धार्मिक स्थळे निष्कासित करणे सोपे नसल्याने महापालिक ा प्रशासनापुढे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
२९ सप्टेंबर २००९ नंतर बेकायदा ५५ धार्मिक स्थळांचे बांधकाम करण्यात आले होते. यातील ५१ स्थळे निष्कासित करण्यात आली आहेत. चार स्थळांचे बांधकाम अद्याप निष्कासित करावयाचे आहे. यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी स्थावर अधिकारी आर.एस. भुते यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. (प्रतिनिधी)
धार्मिक स्थळासाठी शासनाचा निधी
शहरातील अनेक बेकायदा धार्मिक स्थळांच्या बांधकामासाठी लोकप्रतिनिधींना निधी उपलब्ध केला आहे. हा निधी खर्च करण्याला प्रशासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे शासनाच्याच निधीतून बांधकाम करण्यात आलेली धार्मिक स्थळे निष्कासित कशी करावी, असा प्रश्न महापालिका प्रशासनाला पडला आहे.
झोननिहाय बेकायदा
धार्मिक स्थळे
झोन बेकायदा धार्मिक स्थळे
लक्ष्मीनगर २४५
धरमपेठ ७३
हनुमाननगर १५३
धंतोली २५३
नेहरूनगर १२८
गांधीबाग ६९
सतरंजीपुरा ११४
लकडगंज २४२
आसीनगर ५८
मंगळवारी ११६
एकूण १४५१