नदीकाठी नियमबाह्य खोदकाम
By Admin | Updated: May 30, 2014 01:11 IST2014-05-30T01:11:01+5:302014-05-30T01:11:01+5:30
तालुक्यातील तामसवाडी, वाघोडा यासह अन्य शिवारात मोठय़ा प्रमाणात विटभट्टय़ा आहेत. यातील बहुतांश विटभट्टय़ा या कन्हान नदीच्या काठी आहेत. या विटभट्टय़ा मालकांनी कन्हान नदीच्या काठी

नदीकाठी नियमबाह्य खोदकाम
महसूल विभागाची मूकसंमती : तामसवाडी, वाघोडा शिवारातील विटभट्टय़ा मालकांचे कृत्य
विजय भुते - पारशिवनी
तालुक्यातील तामसवाडी, वाघोडा यासह अन्य शिवारात मोठय़ा प्रमाणात विटभट्टय़ा आहेत. यातील बहुतांश विटभट्टय़ा या कन्हान नदीच्या काठी आहेत. या विटभट्टय़ा मालकांनी कन्हान नदीच्या काठी नियमबाह्यरीत्या अवैध खोदकाम करून येथील माती विटा तयार करण्यासाठी वापरायला सुरुवात केली आहे. या गंभीर प्रकाराला महसूल विभागाची मूकसंमती असल्याचे दिसून येते. परिणामी, नदीचे अस्तित्व धोक्यात येऊन नदीकाठी वसलेल्या गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे.
तालुक्यात इटगाव, पारडी, तामसवाडी, डोरली, वाघोडा, सिंगोरी, नेरी, पालोरा, माहुली या शिवारात मोठय़ा प्रमाणात विटभट्टय़ा आहेत. यातील तामसवाडी व वाघोडा शिवारातील विटभट्टय़ा या कन्हान नदीच्या तिरावर आहेत. या सर्व विटभट्टय़ांमध्ये विटा तयार करण्यासाठी माती वापरली जाते. नदी परिसरात खोदकाम करताना १00 फुटांपलिकडे मातीचे पाच फुटांपेक्षा अधिक खोलवर खोदकाम करू नये, असा नियम आहे. मात्र, विटभट्टय़ा मालक या परिसरात जेसीबी मशीनद्वारे मातीचे खोदकाम करीत आहेत. त्यामुळे येथे अंदाजे ३५ ते ३५ फूट खोल मोठमोठे खड्डे पडले आहेत.
विटभट्टय़ांसाठी लागणार्या मातीची महसूल विभागाकडून रीतसर परवानगी दिली जाते. यासाठी एक ते दीड हजार रुपये प्रति ब्रास माती याप्रमाणे शुल्क आकारून तो वसूल केला जातो. त्यानंतर नियमानुसार खोदकामास परवानगी दिली जाते. यातील काहींनी या परिसरात स्वत:च्या जागेवर विटभट्टय़ा सुरू करून विनापरवानगी मोठय़ा प्रमाणात मातीचे खोदकाम केले आहे. ओव्हरलोड वाहतुकीमुळे पारडी-खंडाळा-तामसवाडी या मार्गाची अल्पावधीतच दैनावस्था झाली आहे. परिसरातील पिपळा-गवणा-गरंडा-वाघोडा-डोरली या मार्गावरही मोठमोठे खड्डे पडले आहेत. वाघोडा शिवारात या विटभट्टी मालकाने नदीकाठी असलेल्या रेतीच्या ढिगार्यावर विटांचा ढीग लावला असून, जेसीबीने खोदकाम करायला सुरुवात केली आहे. हा प्रकार मागील काही वर्षांंपासून सुरू असल्याचे जाणकारांनी सांगितले. यातील काही विटभट्टी मालकांकडे स्थानिक ग्रामपंचायतचे नाहरकत प्रमाणपत्र नाही. तामसवाडी व इटगाव शिवारात कन्हान नदीकाठी ३00 एकर क्षेत्रात झुडपी जंगल आहे. यात मोठय़ा प्रमाणात सीताफळाची झाडे होती. विटभट्टी मालकांनी केलेल्या अवैध खोदकामात ही झाडे नष्ट झाली आहेत. या अवैध वृक्षतोडीमुळे एकीकडे पर्यावरणाचे संतुलन ढळत चालले आहे तर, दुसरीकडे नदीच्या काठी खोदकाम केल्याने नदीच्या पात्राला आणि नदीकाठी वसलेल्या गावांना धोका निर्माण झाला आहे. या गंभीर बाबीकडे महसूल विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे.