संतापजनक! आणखी एका चार वर्षीय मुलीवर अत्याचार; नातेवाईकच बनला भक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2023 20:36 IST2023-04-19T20:36:14+5:302023-04-19T20:36:45+5:30
पोलीस अधिकाऱ्यांना नागपुरातील महिला सुरक्षा एकदम ‘परफेक्ट’ असल्याचे वाटत असले तरी प्रत्यक्षात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. सलग तिसऱ्या दिवशी अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे.

संतापजनक! आणखी एका चार वर्षीय मुलीवर अत्याचार; नातेवाईकच बनला भक्षक
नागपूर : पोलीस अधिकाऱ्यांना नागपुरातील महिला सुरक्षा एकदम ‘परफेक्ट’ असल्याचे वाटत असले तरी प्रत्यक्षात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. सलग तिसऱ्या दिवशी अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत नातेवाईकच भक्षक बनला व नराधमाने अवघ्या चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार केले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला.
विष्णू सुखलाल भारती (२८) असे आरोपीचे नाव आहे. विष्णू हा पिडीत मुलीच्या आईचा नातेवाईकच आहे. त्याचे त्यांच्या घरी नेहमी येणेजाणे होते. १७ एप्रिल रोजी तो सकाळच्या सुमारास त्यांच्या घरी आला. मुलीची आई कामावर गेली होती व चार वर्षीय मुलगी ही १० वर्षाच्या नात्यातीलच मुलीसोबत घरी होती. दोन्ही मुली खेळत असताना विष्णूने १० वर्षीय मुलीला पैसे घेऊन दुकानात खाऊ आणण्यासाठी पाठविले. त्याने जाणुनबुजून तिला दुरच्या दुकानात पाठविले. त्यानंतर वासनांध विष्णूने चार वर्षीय मुलीवर अत्याचार केला. यानंतर मुलीला वेदना होऊ लागल्या व तिची तब्येत खराब झाली. तिच्या आईने घरी आल्यावर काय झाले असे विचारले असता तिने व १० वर्षीय मुलीने जी माहिती दिली त्यानंतर तिच्या पायाखालची जमीनच सरकली. नातेवाईक असलेल्या विष्णूने आपल्या मुलीवर अत्याचार केल्याचे एकून महिला संतापली व तिने थेट कळमना पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी तिच्या तक्रारीवरून विष्णूविरोधात पोक्सो कायद्याअन्वये गुन्हा नोंदविला व त्याला अटक केली.