परिस्थिती हाताबाहेर, रुग्ण करताहेत पलायन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:07 IST2021-04-19T04:07:30+5:302021-04-19T04:07:30+5:30
आशीष दुबे नागपूर : जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण वेगाने पसरत आहे. सरकारी आणि खासगी दवाखाने फुल्ल झाले आहेत. रुग्णांना बेड ...

परिस्थिती हाताबाहेर, रुग्ण करताहेत पलायन
आशीष दुबे
नागपूर : जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण वेगाने पसरत आहे. सरकारी आणि खासगी दवाखाने फुल्ल झाले आहेत. रुग्णांना बेड मिळणेही दुरापास्त झाले आहे. यामुळे उपचारासाठी हे रुग्ण आता थेट नागपूरहून अमरावती किंवा चंद्रपूरची वाट धरत आहेत, तर काही रुग्ण कमी खर्चातील उपचारासाठी गोंदिया आणि वर्धापर्यंत जात आहेत.
नागपुरातील खासगी रुग्णालयांमधील उपचाराचा खर्च करण्यास सक्षम नसणारे रुग्ण अन्य शहरांची वाट पकडत आहेत. शासकीय रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध नसल्याने नाइलाजाने रुग्णाला खासगी रुग्णालयात नेऊन महागडा खर्च करावा लागत आहे. खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याने अनेक जण अमरावती, चंद्रपूर, वर्धा व गोंदिया जिल्ह्यातील रुग्णालयांचा शोध घेत असल्याचे विदारक चित्र आहे. कामठीमधील एका रुग्णाचे नातेवाईक ‘लोकमत’कडे आपबिती सांगताना म्हणाले, ते शुक्रवारपासून सातत्याने नागपुरातील दवाखान्यात असणाऱ्या बेडची प्रतीक्षा करीत होते. रुग्णाला घेऊन शनिवारी पहाटे ४ वाजेपासून तर सायंकाळी ६ वाजेपर्यंत इंदिरा गांधी शासकीय मेडिकल कॉलेज व मेयोसमोर बसले होते. मात्र तेथील रुग्णांची वेटिंग लिस्ट संपता संपत नव्हती. इकडे रुग्णाची प्रकृती ढासळत चालली होती. चंद्रपुरातील एका नातेवाइकासोबत संपर्क साधल्यावर तिथे एक बेड रिकामा झाल्याचे कळले. त्यामुळे तातडीने ते रुग्णाला घेऊन तिकडे रवाना झाले.
जरीपटकामधील एक व्यक्ती आपल्या मुलाचा जीव वाचविण्यासाठी गुरुवारपासून बेड मिळविण्याच्या प्रयत्नात होती. मात्र यश आले नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी मुलासाठी एक ऑक्सिजन बेड उपलब्ध व्हावा, अशी विनंती केली. हे वाचून व्हाॅट्सॲप ग्रुपमधील एका व्यक्तीने या मुलासाठी अमरावतीमध्ये व्हेंटिलेटर बेड उपलब्ध करून दिला. तेव्हा कुठे शनिवारी रात्री ८ वाजता ते तिकडे मुलाला घेऊन निघाले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील एका अधिकाऱ्याच्या नातेवाइकाचे तीन दिवसांपासून बेडसाठी प्रयत्न सुरू होते. नातेवाइकांच्या माध्यमातून संपर्क साधल्यावर रविवारी वर्धा येथील रुग्णालयात एक ऑक्सिजन बेड मिळाला.
...
तालुक्यातील कोविड केअर सेंटरमध्येच मरताहेत रुग्ण
नागपूर शहरापेक्षाही वाईट परिस्थिती ग्रामीण भागात आहे. खेड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढत आहेत. तेथील शासकीय रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करण्याची पुरेशी व्यवस्था नाही. फक्त कामठी व मौदा या ठिकाणीच ऑक्सिजन बेड असलेले हॉस्पिटल सुरू केले आहे. येथेही शहरातील रुग्णसंख्या लक्षात घेऊनच रुग्णांना दाखल करून घेतले जात आहे. जिल्ह्यातील काही तहसीलस्तरावर कोविड केअर सेंटर (सीसीसी) सुरू केले आहेत. मात्र शहरातील शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये बेड मिळत नसल्याने सीसीसीमध्ये रुग्णांना भरती केले जात आहे. येथे कसल्याही सुविधा, सोयी नसल्याने उपचाराअभावी रुग्णांची स्थिती बिघडत चालली आहे. डॉक्टरांच्या मते, वेळेवर प्रभावी औषध मिळत नसल्याने ग्रामीण क्षेत्रातील मृत्यूचा आकडा वाढत आहे.
...
पुढारी, सरकार आणि प्रशासनावर जनता नाराज
कोरोना संक्रमितांना पुरेसा उपचार व सुविधा मिळत नसल्याने ते पुढारी, सरकार आणि प्रशासनावर नाराज आहेत. परिस्थिती लक्षात घेऊन आधीच उपाययोजना आखल्या नाही. कॉल करूनही जनप्रतिनिधी कॉल स्वीकारत नाहीत, अनेकांचे मोबाईल बंद आहेत. प्रशासनाकडूनही मदत मिळत नसल्याने जनता सर्वांवरच संतापली आहे.
...