लाखोंची कार नाकारणारा जावई आमचा भला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:26 IST2020-12-15T04:26:21+5:302020-12-15T04:26:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विवाहसोहळा म्हटला की रुसव्या-फुगव्यांची रास असते आणि याचा अनुभव कमी-जास्त प्रमाणात सगळ्यांनाच असेल. सासरच्या ...

लाखोंची कार नाकारणारा जावई आमचा भला
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विवाहसोहळा म्हटला की रुसव्या-फुगव्यांची रास असते आणि याचा अनुभव कमी-जास्त प्रमाणात सगळ्यांनाच असेल. सासरच्या मंडळींना खूश ठेवण्यासाठी मुलीच्या माहेरची मंडळी जिवापाड प्रयत्न करतात तरी उणिवा काढण्यात वरमंडळी तरबेज असतात. मात्र, काही अपवाद असतात आणि तो अपवाद आज नागपूरकरांनी अनुभवला. प्रेमापोटी मिळालेली महागडी सुमारे २० लाखांची कार जावईबापूंनी ससन्मान परत करत सासरकडील मंडळीचा विश्वास संपादन केला. मुलगी खरेच उत्तम घरात पडली, याचे समाधान मुलीकडील मंडळींनी व्यक्त केले.
विवाह हा दोन भिन्न शरीरांचा नव्हे तर मनांचा आणि दोन घराण्यांच्या मिलनाचा सोहळा आहे. त्यामुळे नैमित्तिक अनुष्ठानांसोबतच चालीरीती लागूनच आल्या. त्यात मुलगी नवऱ्याघरी जाणार आणि तिचा संसार फुलवणार म्हणून माहेराहून आनंदाश्रूंनी निरोप देताना शुभशकुन म्हणून नवदाम्पत्याची ओटी भेटवस्तूंनी भरली जाते. तसेच प्रयत्न चांडक ले-आऊट, कॉटन मार्केट येथील गुप्ता परिवाराकडून झाले. ११ डिसेंबर रोजी संगीता कालिदास गुप्ता यांची मुलगी स्वप्निल व लक्ष्मी अनिल आर्य यांचा मुलगा शशांक याचा विवाह पार पडला. विदाई समारंभात गुप्ता कुटुंबीयांकडून नवऱ्या मुलाला अचानक महागडी कार भेट करण्यात आली. मात्र, ती कार अतिशय सन्मानाने परत करण्याची दानत शशांकने दाखवली. विवाहवेदीवर बसण्यास इच्छुक असलेल्या अनेक तरुणांसाठी हा एक पायंडाच शशांकने निर्माण केल्याची भावना विवाह सोहळ्यात सहभागी झालेले श्याम पालीवाल, ताराचंद पालीवाल, जुगलकिशोर पालीवाल यांनी लोकमतकडे व्यक्त केली. विशेष म्हणजे, ही कार विवाहस्थळावर पोहोचलीही होती आणि फुलांनी सजलेली कार सर्व उपस्थितांनी बघितलीही होती. मात्र, नवरदेवाकडून मिळालेली ही उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिक्रिया बघून सारेच सुखावले. मुलीच्या माहेराकडूनही जावयाच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.