...अन्यथा ‘फौजदारी’ कारवाई
By Admin | Updated: July 1, 2014 00:54 IST2014-07-01T00:54:18+5:302014-07-01T00:54:18+5:30
प्रवेशबंदी असतानादेखील विद्यार्थ्यांना प्रवेश देणाऱ्या महाविद्यालयांच्या दबावाखाली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने विशेष परीक्षा घेण्याचा निर्णय तर घेतला. परंतु या महाविद्यालयांत

...अन्यथा ‘फौजदारी’ कारवाई
नागपूर विद्यापीठाचा प्राचार्यांना इशारा : ६३ महाविद्यालयांना एका दिवसात सादर करावे लागणार शपथपत्र
नागपूर : प्रवेशबंदी असतानादेखील विद्यार्थ्यांना प्रवेश देणाऱ्या महाविद्यालयांच्या दबावाखाली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने विशेष परीक्षा घेण्याचा निर्णय तर घेतला. परंतु या महाविद्यालयांत उपस्थिती, प्रवेश, अभ्यासक्रम यासंदर्भातील नियमांचे पालन करण्यात आले की नाही, यासंदर्भात विद्यापीठाकडे माहितीच उपलब्ध नाही. त्यामुळे ६३ महाविद्यालयांना एका दिवसाच्या आत विस्तृत माहिती भरून शपथपत्र सादर करण्याचे निर्देश विद्यापीठाकडून मंगळवारी देण्यात आले. जर या शपथपत्रात सादर करण्यात आलेली माहिती खोटी आढळली तर महाविद्यालयाचे अध्यक्ष, प्राचार्य यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
प्रवेशबंदी असलेल्या महाविद्यालयांतील नियमबाह्य पद्धतीने प्रवेशित विद्यार्थ्यांची विशेष परीक्षा घेण्यात यावी, असे निर्देश ११ जून रोजी राज्य शासनाने दिले होते. २६ जून रोजी विद्यापीठाच्या विद्वत परिषदेच्या बैठकीतदेखील ही परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु या विद्यार्थ्यांची व वर्षभर महाविद्यालयांत झालेल्या अभ्यासवर्गांची विद्यापीठाकडे माहितीच उपलब्ध नाही. त्यामुळे मंगळवारी यासंदर्भात ६३ महाविद्यालयांना पत्र लिहिण्यात आले. यानुसार १ जुलैपर्यंत विद्यापीठाच्या महाविद्यालयीन शाखेकडे शपथपत्र जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
जर महाविद्यालयांतील कोणतेही प्रवेश नियमबाह्य आढळले तर त्यासाठी संस्थेचे अध्यक्ष, प्राचार्य जबाबदार राहतील व शपथपत्रांतील माहिती खोटी ठरली तर संबंधितांविरुद्ध कायदेशीर तसेच फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा विद्यापीठातर्फे देण्यात आला आहे. दरम्यान, अवघ्या एका दिवसात शपथपत्र जमा करायचे असल्याने महाविद्यालयांची चांगलीच धावपळ होणार हे निश्चित. (प्रतिनिधी)