उस्मानला नाकारली याकूबची भेट
By Admin | Updated: July 29, 2015 02:49 IST2015-07-29T02:49:53+5:302015-07-29T02:49:53+5:30
कारागृह प्रशासनाने विशिष्ट कारणाचा हवाला देत मंगळवारी उस्मान मेमन आणि त्याच्या वकिलाला याकूब मेमनची भेट घेऊ देण्यास नकार दिला.

उस्मानला नाकारली याकूबची भेट
कारागृह प्रशासनाची भूमिका : वकिलालाही टाळले
नागपूर : कारागृह प्रशासनाने विशिष्ट कारणाचा हवाला देत मंगळवारी उस्मान मेमन आणि त्याच्या वकिलाला याकूब मेमनची भेट घेऊ देण्यास नकार दिला. रात्री ६.४५च्या सुमारास ही घडामोड उघड झाल्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
डेथ वॉरंटच्या वृत्तासोबतच याकूबला ३० जुलैला फाशी दिली जाणार असल्याचे वृत्त प्रकाशित झाल्यापासून त्याचे नातेवाईक आणि वकिलांनी कारागृहात येऊन याकूबची भेट घेण्यासाठी धावपळ चालवली आहे. या मालिकेत सर्वप्रथम २० जुलैला याकूबचा नातेवाईक उस्मान मेमन याने अॅड. अनिल गेडामसोबत कारागृहात याकूबची भेट घेतली. २१ जुलैला सकाळी ९ च्या सुमारास दिल्लीतील वकील शुबेल फारूख यांनी याकूबची कारागृहात भेट घेऊन क्युरेटिव्ह पिटीशनच्या अनुषंगाने विस्तृत चर्चा केली. यावेळी शुबेल यांच्यासोबत उस्मान कारागृहात गेला होता.
दुपारी सर्वोच्च न्यायालयाने याकूबची क्युरेटिव्ह पिटीशन खारीज केली. त्यानंतर सायंकाळी अॅड. अनिल गेडाम पुन्हा कारागृहात गेले. यावेळी गेडाम यांनी याकूबची भेट घेत त्याचा दयेचा अर्ज राज्यपालांकडे पाठविण्यासाठी कारागृह अधीक्षकांकडे दिला. २३ जुलैला याकूबची पत्नी रहिन आणि मुलगी जुबेदासह पाच नातेवाईकांनी याकूबची कारागृहात भेट घेतली. २४ ते २७ जुलै या दिवसात याकूबच्या फाशीच्या शिक्षेवर देश-विदेशात उलटसुलट चर्चा सुरू होती. मंगळवारी २८ जुलैला दुपारी ४.१५ ला उस्मान मेमन पुन्हा याकूबची भेट घेण्यासाठी कारागृहात पोहचला. त्याच्यासोबत अॅड. गेडामही कारागृहाच्या आत गेले. त्यामुळे त्यांच्यात काय चर्चा होते, त्याकडे प्रसार माध्यमाचे लक्ष लागले होते.
सायंकाळी ६.४५च्या सुमारास उस्मान आणि अॅड. गेडाम बाहेर आले. तेव्हा प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांच्याकडे धाव घेतली. प्रश्नांची सरबत्ती झाल्यानंतर उस्मान याने आज याकूबची भेट झाली नसल्याचे सांगितले. त्यानंतर कोणत्याही प्रश्नाला उत्तर न देता ‘थँक्यू‘ म्हणत तो कारमध्ये बसून निघून गेला. (प्रतिनिधी)
तांत्रिक कारण : गेडाम
तीन तास कारागृहात असलेल्या उस्मानला कारागृह प्रशासनाने याकूबची भेट का घेऊ दिली नाही, ते जाणून घेण्यासाठी लोकमत प्रतिनिधीने कारागृहाच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार संपर्क केला. मात्र, त्यांच्याकडून खुलासा होऊ शकला नाही. तर, अॅड. गेडाम यांनी ‘तांत्रिक कारणामुळे‘ भेट नाकारल्याचे सांगून अधिक बोलण्यास नकार दिला.