नागपूरच्या शेतकऱ्यांनी पिकविला सेंद्रिय ‘ब्लॅक राईस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 10:29 AM2019-01-08T10:29:39+5:302019-01-08T10:30:07+5:30

नागपूरच्या शेतकऱ्यांनी पहिल्यांदाच सेंद्रिय ब्लॅक राईस पिकविला आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशा पद्धतीचा प्रयोग करण्यात आला असून, आरोग्यवर्धक असलेला हा काळा तांदूळ आता सामान्य नागपूरकरांनाही खरेदी करता येणार आहे.

Organic 'Black Rice' grown by farmers of Nagpur | नागपूरच्या शेतकऱ्यांनी पिकविला सेंद्रिय ‘ब्लॅक राईस’

नागपूरच्या शेतकऱ्यांनी पिकविला सेंद्रिय ‘ब्लॅक राईस’

Next
ठळक मुद्दे जिल्हा कृषी महोत्सवात १२ पासून उपलब्ध

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरच्या शेतकऱ्यांनी पहिल्यांदाच सेंद्रिय ब्लॅक राईस पिकविला आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशा पद्धतीचा प्रयोग करण्यात आला असून, आरोग्यवर्धक असलेला हा काळा तांदूळ आता सामान्य नागपूरकरांनाही खरेदी करता येणार आहे.
जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सोमवारी पत्रपरिषदेत ही माहिती दिली. याबाबत अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासोबत सेंद्रिय उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी येत्या १२ ते १६ जानेवारीदरम्यान कृषी विभागाच्या ‘आत्मा’तर्फे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ वसतिगृह परिसर क्रीम्स हॉस्पिटलसमोर रामदासपेठ रोड येथे जिल्हा कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून ग्राहकांनाही शेतकऱ्यांकडून थेट माल खरेदी करता येणार आहे. या महोत्सवात २०० स्टॉल असणार आहेत. यात ४० शासकीय, ३० स्टॉल कृषी आणि सिंचनाशी संबंधित, ४० स्टॉल गृहोपयोगी वस्तू तर २० स्टॉल धान्य महोत्सवाचे असणार आहेत. कृषी प्रदर्शनासह परिसंवाद, चर्चासत्रही होणार असून यात प्रगतिशील शेतकरी आणि तज्ज्ञांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनही करणार आहे.
काळ्या तांदळाच्या उत्पादनाला विशेष प्रोत्साहन देण्यात येत आहे. नागपूर जिल्ह्यातील रामटेक, मौदा, उमरेड, कुही, पारशिवनी व कामठी या तालुक्यामध्ये ७० एकर क्षेत्रात गटांमार्फत काळा तांदूळ पिकविण्यात आला. हा प्रयोग पहिल्यांदाच महाराष्ट्रात झाला. येणाऱ्या खरीप हंगामात ४०० एकरमध्ये काळ्या तांदळाच्या शेतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. काळा तांदूळ हा हृदयरोगापासून तर विविध आजारांवर लाभदायक आहे. या महोत्सवात सेंद्रिय तांदळासोबतच तूर डाळ, चणा डाळ, गहू, ज्वारी, तीळ, मसाले, भाजीपाला, फळे आदीही विक्रीला राहतील. सेंद्रिय शेतमाल नागपूर आॅर्गनिक फार्म प्रोड्युस सिस्टीम (एनओएफपीएस) या ब्रॅण्डखाली ते विक्रीला उपलब्ध राहतील.
महोत्सवाचे उद्घाटन १२ जानेवारीला खासदार कृपाल तुमाने यांच्या हस्ते होईल. यावेळी आत्माच्या जिल्हा प्रकल्प संचालक नलिनी भोयर, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर उपस्थित होते.

शेतकऱ्यांचा सन्मान
जिल्ह्यातील शासन पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांसोबत कृषी व संबंधित क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे, प्रयोगशील शेतकरी तसेच जिल्हा व तालुकास्तरावरील पीक स्पर्धा विजयी शेतकरी, गट संस्था यांचा प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी मुदगल यांनी सांगितले.

Web Title: Organic 'Black Rice' grown by farmers of Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती