आदेशाचे उल्लंघन, वॉरंट जारी
By Admin | Updated: January 16, 2015 00:57 IST2015-01-16T00:57:26+5:302015-01-16T00:57:26+5:30
व्यक्तीश: उपस्थित राहून स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेश न पाळल्यामुळे पिंपळगाव (ता. बाळापूर, अकोला) येथील ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समितीचे अध्यक्ष भीमराव पटोले

आदेशाचे उल्लंघन, वॉरंट जारी
हायकोर्ट : पाणी पुरवठा समिती अध्यक्षाला दणका
नागपूर : व्यक्तीश: उपस्थित राहून स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेश न पाळल्यामुळे पिंपळगाव (ता. बाळापूर, अकोला) येथील ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समितीचे अध्यक्ष भीमराव पटोले यांच्याविरुद्ध हायकोर्टाने १० हजार रुपयांचा जामीनपात्र वॉरंट जारी केला आहे.
सार्वजनिक विहिरीच्या कामात झालेल्या गैरव्यवहारावर स्पष्टीकरण सादर करण्यासाठी समितीच्या अध्यक्षांनी १४ जानेवारी रोजी व्यक्तीश: उपस्थित राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. परंतु, या तारखेला पटोले अनुपस्थित राहिले. यामुळे न्यायालयाने संतप्त होऊन जामीनपात्र वॉरंट बजावला व यावर ४ फेब्रुवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत. याप्रकरणी सोनाजी गवई यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. पिंपळगाव येथे पाणी पुरवठा योजनेंतर्गत विहीर खोदकाम व बांधकामाकरिता मिळालेल्या निधीचा योग्य उपयोग करण्यात आला नाही. अधिकाऱ्यांनी गैरव्यवहार केला असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. विहिरीची खोली ३० फूट असून यापैकी २० फुटांपर्यंतच्या बांधकामावर ५ लाख ९७ हजार रुपये खर्च झाल्याची माहिती अकोला जिल्हा परिषदेच्या वकिलाने दिली होती.
ही बाब लक्षात घेता न्यायालयाने जिल्हा परिषदेकडून आतापर्यंत किती काम पूर्ण करण्यात आले व त्यावर किती खर्च झाला याची चौकशी करण्यासाठी अकोला येथील जीवन प्राधिकरणचे अधीक्षक अभियंत्यांची आयुक्त म्हणून नियुक्ती केली होती. आयुक्ताने अहवाल सादर केल्यानंतर न्यायालयाने समिती अध्यक्षाला बोलावले होते. याचिककार्त्यातर्फे अॅड. अलोक डागा यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)