स्पेक्ट्रम रुग्णालयाचे बांधकाम थांबविण्याचा आदेश
By Admin | Updated: June 13, 2017 01:40 IST2017-06-13T01:40:24+5:302017-06-13T01:40:24+5:30
वर्धा रोडवरील साई मंदिर चौकातील निर्माणाधीन स्पेक्ट्रम रुग्णालयाचे बांधकाम पुढील निर्देशापर्यंत थांबविण्याचा आदेश लक्ष्मीनगर झोन कार्यालयाद्वारे जारी करण्यात आला आहे.

स्पेक्ट्रम रुग्णालयाचे बांधकाम थांबविण्याचा आदेश
एका मजुराचा मृत्यू : रविवारी कोसळली होती सुरक्षा भिंत
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वर्धा रोडवरील साई मंदिर चौकातील निर्माणाधीन स्पेक्ट्रम रुग्णालयाचे बांधकाम पुढील निर्देशापर्यंत थांबविण्याचा आदेश लक्ष्मीनगर झोन कार्यालयाद्वारे जारी करण्यात आला आहे. रविवारी रुग्णालयाची सुरक्षा भिंत कोसळल्यामुळे नऊ मजूर गंभीररीत्या जखमी झाले होते. यात सुपरवायझर दिनेश फेंडरचा सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. सोमवारी सकाळपर्यंत मनपाच्या एकाही अधिकाऱ्याने घटनास्थळाचे निरीक्षण केले नाही. ही बाब लक्षात आल्यानंतर अपर आयुक्त डॉ. रामनाथ सोनवणे यांनी लक्ष्मीनगर झोनच्या सहायक आयुक्त सुवर्णा दखने यांना रुग्णालयाला नोटीस जारी करण्याचे निर्देश दिलेत. त्यामुळे रुग्णालयाला ताबडतोब नोटीस जारी करून पुढील निर्देशापर्यंत बांधकाम थांबविण्याचा आदेश देण्यात आला.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, नियमांना धाब्यावर ठेवून रुग्णालयाचे बांधकाम केले जात आहे. रुग्णालयाला लागून यश बोरगावकर व एस. वाय. वरंभे यांचे घर आहे. बोरगावकर यांचे घर ५० वर्षे जुने आहे. रुग्णालयासाठी नियमबाह्यरीत्या जमीन खोदण्यात आली आहे.त्यामुळे आजूबाजूच्या घरांना धोका निर्माण झाला आहे.
ठेकेदारास अटक
ठेकेदार समीर तिवारी याला धंतोली पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात बांधकामादरम्यान मजुरांच्या सुरक्षेबाबत निष्काळजीपणा बाळगण्यात आल्याची बाब उघडकीस आली होती.
नियमानुसार कारवाई
रुग्णालयाला नोटीस जारी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रुग्णालयाचे बांधकाम नियमानुसार होत आहे किंवा नाही याची माहिती घेतली जाईल. त्यानंतर आवश्यक कारवाई केली जाईल.
- डॉ. रामनाथ सोनवणे,
अपर आयुक्त, मनपा.