आठ शाळांच्या स्कूलबस बंद करण्याचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 23:20 IST2018-01-10T23:19:00+5:302018-01-10T23:20:39+5:30
नियमांचे पालन करण्यात येत असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर न केल्यामुळे रॅडक्लिफ स्कूल, संस्कार इंग्लिश कॉन्व्हेंट, संस्कार विद्यानिकेतन, शिवमुद्रा रॉयल स्कूल, न्यू इंदिरा कॉन्व्हेंट, सावित्रीबाई बोरकर कन्या विद्यालय, महेश प्राथमिक शाळा व फ्रेन्डस् पब्लिक स्कूल यांच्या स्कूलबसेस तत्काळ बंद करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिला.

आठ शाळांच्या स्कूलबस बंद करण्याचा आदेश
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नियमांचे पालन करण्यात येत असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर न केल्यामुळे रॅडक्लिफ स्कूल, संस्कार इंग्लिश कॉन्व्हेंट, संस्कार विद्यानिकेतन, शिवमुद्रा रॉयल स्कूल, न्यू इंदिरा कॉन्व्हेंट, सावित्रीबाई बोरकर कन्या विद्यालय, महेश प्राथमिक शाळा व फ्रेन्डस् पब्लिक स्कूल यांच्या स्कूलबसेस तत्काळ बंद करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिला.
प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व स्वप्ना जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. प्रकरणात १३७ शाळा प्रतिवादी आहेत. न्यायालयाने सर्व शाळांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी पुरेशी संधी दिली होती. त्यानंतरही वरील शाळांनी मुजोरीने वागून न्यायालयात हजर होणे टाळले. परिणामी, त्यांना दणका देण्यात आला आहे.
वरील शाळा वगळता इतरांनी स्कूलबस नियमांचे पालन करीत असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. या प्रकरणातील न्यायालय मित्र अॅड. फिरदोस मिर्झा यांना पटलावरील प्रतिज्ञापत्रातील माहितीची सत्यता पडताळण्यास सांगण्यात आले आहे. त्यांना येत्या २४ जानेवारी रोजी यासंदर्भात अहवाल सादर करायचा आहे. याविषयी न्यायालयात २०१२ पासून जनहित याचिका प्रलंबित आहे. न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या आदेशांमुळे स्कूलबस परिवहनात अनेक सकारात्मक बदल घडले आहेत.