बाळासाहेब ठाकरेंच्या नावाला वाढला विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:56 IST2021-02-05T04:56:54+5:302021-02-05T04:56:54+5:30
लोकमत न्यू नेटवर्क नागपूर : गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाला दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले आहे. या नामकरणाला विदर्भवादी ...

बाळासाहेब ठाकरेंच्या नावाला वाढला विरोध
लोकमत न्यू नेटवर्क
नागपूर : गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाला दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले आहे. या नामकरणाला विदर्भवादी व आदिवासी संघटनांसह विविध संघटनांनी विरोध दर्शविला आहे. हा विरोध वाढला असून उद्या २६ जानेवारी रोजी होणाऱ्या उद्घाटनप्रसंगी कार्यक्रम स्थळासह विविध ठिकाणी निषेध आंदोलन करण्यात येणार आहे.
विदर्भवादी मुख्य गेटसमोरच आंदोलन करणार
विदर्भ राज्य आंदोलन समितीचा या नामकरणाला विरोध आहे. कार्यक्रम स्थळी आंदोलन करण्यात येऊ नये, म्हणून पोलीस आयुक्तांनी त्यांच्याशी चर्चा केली होती. परंतु ती निष्फळ ठरली. २६ जानेवारी रोजी विदर्भवादी कार्यकर्ते गोरेवाडा प्राणी प्रकल्पाच्या मुख्य गेटसमोर विरोध प्रदर्शन करतील. उद्धव ठाकरे परत जा, अशा घोषणा देतील, असे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी स्पष्ट केले आहे.
आदिवासी संघटनांचे विधानभवनासमोर धरणे आंदोलन
या नामकरणाला आदिवासी संघटनांचा विरोध कायम आहे. गोरेवाडा येथील प्राणिसंग्रहालयाला गोंडवाना हे नाव देण्याची त्यांची मागणी आहे.
या मागणीसाठी विविध आदिवासी समाज संघटनांच्यावतीने २६ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता विधानभवनासमोर असलेल्या गोंड राजे बख्त बुलंद शाह उईके यांच्या पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती माजी महापौर माया इवनाते यांनी आज पत्रपरिषदेत दिली. आदिवासी समाज शांततेने आपले आंदोलन करेल. आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्यासाठी वेळ मागितली आहे. केवळ मुख्यमंत्र्यांना खुष करण्यासाठी वनमंत्र्यांनी हा प्रकार केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून हा निर्णय मागे घ्यावा व गोंडवाना प्राणिसंग्रहालयाचा नवीन शासननिर्णय जारी करावा, अशी मागणीही त्यांनी केली. पत्रपरिषदेत ऑल इंडिया आदिवासी एम्प्लाइज फेडरेशनचे प्रा. मधुकर ऊईके, रॉयल गोंडवाना आदिवासी विकास युवा संस्थेचे आकाश मडावी, रुतिका मसराम आदी उपस्थित होते.
बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियातर्फे विभागीय आयुक्तांना निवेदन
गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाला दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याच्या विरोधात दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियातर्फे सोमवारी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांना निवेदन सादर करण्यात आले. शिष्टमंडळात भीमराव फुसे, जे.आर. गोडबोले, सी.आर. सोनडवले, आनंद सायरे, तुलाराम रामटेके, दशरथ शंभरकर, विकास उंदिरवाडे, रमेश गायकवाड, रमेश डोंगरे आदींचा समावेश होता.