नागपूर मनपातील सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याची विरोधकांना संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 00:41 IST2017-12-02T00:31:26+5:302017-12-02T00:41:43+5:30
सत्तापक्षाच्या नगरसेवकांच्या फाईल मंजूर होत आहेत. परंतु विरोधी पक्षाच्या नगरसेवकांच्या फाईल प्रलंबित ठेवल्या जातात.

नागपूर मनपातील सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याची विरोधकांना संधी
आॅनलाईन लोकमत
नागपूर : सत्तापक्षाच्या नगरसेवकांच्या फाईल मंजूर होत आहेत. परंतु विरोधी पक्षाच्या नगरसेवकांच्या फाईल प्रलंबित ठेवल्या जातात. अधिकाऱ्यांना अशा स्वरुपाच्या सूचना सत्तापक्षातील ज्येष्ठ नगरसेवकांनी दिल्या आहेत. शहरातील अर्धवट सिमेंट रोड,रस्त्यांवरील खड्डे व विकास निधीच्या मुद्यावरून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्तापक्षाला धारेवर धरण्याची संधी विरोधकांना मिळाली आहे. परंतु आपसातील मतभेदामुळे विरोधकात यात यशस्वी होतात की नाही याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
नियमाचा आधार घेत विरोधी पक्षाच्या सदस्यांचे प्रश्न नाकारले जात आहे. परंतु भाजपाच्याच काही नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांना शांत करण्यासाठी पदाधिकाऱ्यांना कसरत करावी लागणार आहे. अधिवेशनाचा विचार करता ८ डिसेंबरच्या सर्वसाधारण सभेच्या कामकाजात वादग्रस्त मुद्दे टाळण्यात आले आहे.
शहरातील रस्त्यांवरील खड्डे, अर्धवट सिमेंट रोड व ठिकठिकाणी साचणारा कचरा यामुळे नागरिक त्रस्त आहेत. त्यातच महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. विकास कामांसाठी निधी उपलब्ध होत नसल्याने विरोधी पक्षाचे नगरसेवक त्रस्त आहेत. काँग्रेसचे रमेश पुणेकर यांनी विकास निधीचा प्रश्न उपस्थित केला आहे. यावर वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.
परंतु गेल्या काही महिन्यातील सभागृहाच्या कामकाजाचा विचार करता काँग्रेस पक्षातील दोन गटांचा सत्ताधाऱ्यांना फायदा झाला आहे. सभागृहात काँग्रेसच्या एका गटाच्या नगरसेवकाने प्रश्न उपस्थित केला तर दुसºया गटातील नगरसेवक पाठिंबा देत नाही. जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीतही कॉंग्रेसला याचा फटका बसला आहे. प्रश्नोत्तराच्या तासात काँग्रेसचे नगरसेवक संदीप सहारे यांना कारखाना विभाग, रमेश पुणेकर यांनी निधी वितरण, बंटी शेळके यांनी सुरक्षा रक्षकांचा प्रश्न उपस्थित केला आहे.