एसएमएसमधील ‘लिंक’ उघडणे पडले महागात, २१ लाखांचा बसला फटका
By योगेश पांडे | Updated: October 12, 2023 15:17 IST2023-10-12T15:12:07+5:302023-10-12T15:17:48+5:30
पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

एसएमएसमधील ‘लिंक’ उघडणे पडले महागात, २१ लाखांचा बसला फटका
नागपूर : अज्ञात व्यक्तीकडून आलेल्या ‘एसएमएस’मधील ‘लिंक’ उघडणे एका उद्योजक तरुणाला चांगलेच महागात पडले. सायबर गुन्हेगारांनी २१ लाख रुपये वळते केले. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
अक्षय रविंद्र काळे (२५, गल्ली क्रमांक ७, महेंद्रनगर) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचा हर्बल्सचा उद्योग आहे. २७ सप्टेंबर रोजी अक्षयला अज्ञात व्यक्तीचा एसएमएस आला. त्यात एक लिंक होती. कुतूहल म्हणून अक्षयने ती ‘लिंक’ उघडून पाहिली. मात्र त्यानंतर फसवणूक होण्याची शक्यता वाटल्याने अक्षयने ‘एसएमएस’च डिलीट करून टाकला. तीन दिवसांत त्याच्या खात्यातून २१ लाखांची रक्कम दुसऱ्या खात्यांमध्ये वळती झाली. हे पाहून तो चांगलाच हादरला. त्याने पाचपावली पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे.