नागपुरात तडीपार गुन्हेगारांचे पोलिसांना खुले आव्हान
By योगेश पांडे | Updated: January 19, 2025 23:39 IST2025-01-19T23:39:23+5:302025-01-19T23:39:49+5:30
दोन वर्षांत दीडशेहून अधिक प्रकरणे उघडकीस : मुदतपूर्व घरवापसी अन् परत गुन्हेगारीत सक्रिय

नागपुरात तडीपार गुन्हेगारांचे पोलिसांना खुले आव्हान
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील काही काळापासून शहरातील गुन्हेगारीचा मुद्दा हा राज्यभरात चर्चेचा विषय ठरला आहे. पोलिसांकडून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आरोपींवर तडीपारीची कारवाई केली जाते व शहर किंवा जिल्ह्याबाहेर रवानगी केली जाते. मात्र, प्रत्यक्षात बरेचसे गुन्हेगार केवळ पंधरा दिवसांच्या आतच शहरात परतून परत गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय होतात. आश्चर्याची बाब म्हणजे, पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेला अनेकदा याची लवकर कल्पनादेखील येत नाही. मागील दोन वर्षांत अशी दीडशेहून अधिक प्रकरणे उघडकीस आली असून हे तडीपार गुन्हेगार पोलिसांनाच खुले आव्हान देत आहेत का, असा सवाल उपस्थित होत आहे.
गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी पोलिसांकडून तडीपारीची कारवाई केली जाते. शहर व जिल्ह्यात शांतता राहावी म्हणून उपद्रवी लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते, तर अट्टल गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार केले जाते. गुन्हे शाखेकडून वेळच्या वेळी सर्व गुंड, गुन्हेगारांची कुंडली काढली जाते. ज्यांच्यावर गंभीर व अधिक गुन्हे आहेत, अशांवर तडीपारीची कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलिस उपायुक्तांकडे पाठविण्यात येतो. मागील दोन वर्षांत शेकडो गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई झाली. मात्र, प्रत्यक्षात तडीपारीची कारवाई बरेचसे गुन्हेगार गंभीरतेने घेत नसल्याचे चित्र आहे. तडीपारीचा आदेश निष्प्रभ ठरत असल्याचे अनेक प्रकरणांत उघड झाले आहे.
ठरावीक मुदतीपर्यंत नागपुरात परतायचे नाही, अशी ताकीद देऊन तडीपार केलेल्या गुन्हेगाराला पोलिस बाहेरगावी नेऊन सोडतात; परंतु तो गुन्हेगार लगेच आपल्या शहरात परततो अन् गुन्हेगारीला लागतो. यातील काहीजणांना पोलिसांकडून परत अटक करण्यात आली. दोन वर्षांत असे दीडशे आरोपी पोलिसांच्या तावडीत सापडले. हा आकडा बराच मोठा असून यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
२०२४ मध्ये ७२ तडीपारांवर कारवाई
सर्वसाधारणत: गुन्हेगारांना सहा महिने, वर्ष किंवा दोन वर्षांसाठी शहर अथवा जिल्ह्यातून तडीपार करण्यात येते. मात्र, तेवढ्या कालावधीसाठी शहराबाहेर न राहता आरोपी काही दिवसांतच परततात. काहीजण उघडपणे घरीच राहतात, तर अनेकजण दुसऱ्या ठिकाणी आसरा शोधतात. पोलिसांच्या माहितीनुसार, २०२३ मध्ये ७८ तडीपार कारवाई झाल्यावर शहरात फिरताना आढळले होते, तर २०२४ मध्ये हा आकडा ७२ इतका होता. आश्चर्याची बाब म्हणजे, यात काही महिलांचादेखील समावेश होता.
२०२५ मध्ये आढळले नऊ तडीपार
वर्षाच्या पहिल्याच महिन्यात अनेक गुन्हेगार तडीपारीची कारवाई झाली असतानादेखील शहरात परतले आहेत. यातील नऊजणांवर २० दिवसांत कारवाई झाली आहे. मात्र, इतरांवर कठोर कारवाई कधी होणार, असा सवाल उपस्थित होत आहे. बऱ्याच तडीपारांच्या मुदतीपूर्वीच्या घरवापसीची पोलिसांना कल्पना असते. मात्र, त्याकडे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष करण्यात येते. काही गंभीर गुन्ह्यांत असे तडीपार मुख्य आरोपी म्हणून समोर आले आहेत.
शहरात आढळलेले तडीपार वर्ष : मुदतपूर्व परतलेले आरोपी
२०२३ : ७८
२०२४ : ७२
२०२५ : ९