भविष्यवाणी करणारेच पोपट असू शकतात; भाजपचे नेतेच वानखेडेंना भेटतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2021 22:03 IST2021-10-29T22:02:13+5:302021-10-29T22:03:32+5:30
Nagpur News फडणवीसांचा पोपट चिठ्ठ्या काढत आहे आणि भविष्यवाणी करत आहे. जे भविष्यवाणी करतात तेच पोपट असू शकतात, असे प्रतिपादन मलिक यांनी केले.

भविष्यवाणी करणारेच पोपट असू शकतात; भाजपचे नेतेच वानखेडेंना भेटतात
नागपूर : विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांची तुलना पोपटाशी केल्यानंतर मलिक यांनी नागपुरात प्रत्युत्तर दिले आहे. फडणवीसांचा पोपट चिठ्ठ्या काढत आहे आणि भविष्यवाणी करत आहे. जे भविष्यवाणी करतात तेच पोपट असू शकतात, असे प्रतिपादन मलिक यांनी केले. मलिक गोंदियाचे पालकमंत्री असून, तेथील आढावा बैठकीसाठी त्यांचे शुक्रवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. त्यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
एनसीबीचे अधिकारी अनेकांना खंडणी मागत आहे. अधिकारी समीर वानखेडे याने २६हून अधिक खोट्या प्रकरणांत शंभराहून अधिक लोकांना अडकविले आहे. अनुराग कश्यप यांनी त्यांचे अनुभव मांडले आहेत. निष्पाप नायजेरियन नागरिकांसह अशा अनेकांना वानखेडेंनी अडकविले आहे. हजारो कोटींची खंडणी कुणी वसूल करत असेल तर त्यांना अडविणे हे माझे काम आहे. वानखडे यांनी जी प्रकरणे दाखल केली त्यात जप्त करण्यात आलेल्या अमलीपदार्थांची मात्रा दोन ते पाच ग्रॅमदरम्यानच होती. एका प्रकरणात त्यांनी ३० चित्रपट कलावंतांना बोलविले. मात्र कुणालाही अटक केली नाही. सगळे काही खंडणीसाठी केले. यासंदर्भात एनसीबीचे डीडीजी ज्ञानेश्वर सिंह यांना पत्र लिहिणार असल्याचे मलिक यांनी सांगितले.
भाजपने बॉलिवूडची प्रतिमा ड्रग्जचा अड्डा अशी बनविली
यावेळी मलिक यांनी राज्य भाजपवरदेखील आरोप लावले. बॉलिवूडची प्रतिमा नियोजनबद्ध पद्धतीने ड्रग्जचा अड्डा अशी तयार करण्यात आली. यात प्रदेश भाजपचा हात आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ नोएडा येथे फिल्मसिटी बनवत आहेत. त्यासाठी भाजपमध्ये असलेले कलाकार प्रयत्नरत आहेत. आम्हाला कुणीही धमकावले तरी आम्ही कुणाला घाबरत नाही. आम्हाला छान झोप लागत असून, आम्ही दुसऱ्यांच्या झोपा उडविल्या असल्याचा चिमटा मलिक यांनी काढला.
भाजपचे नेते वानखेडेंना भेटतात
वानखेडे यांच्यावर कुठले वैयक्तिक आरोप करण्यात आलेले नाही. त्यांनी अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र दाखवून त्याचा फायदा घेतलेला आहे. त्यांच्या वडिलांनी धर्मांतर करून लग्न लावले होते. त्यांचे शिक्षण मुस्लीम म्हणून झाले आहे. त्यांचा दाखला बोगस असून, त्याची चौकशी केली पाहिजे. मुस्लीम व्यक्तीने धर्मांतर केले असेल तर त्याला अनुसूचित जातींना मिळणारे लाभ घेता येत नाही. भाजपचे नेते समीर वानखेडे यांना भेटत आहे. त्यांचे कोणत्या नेत्यांशी संबंध आहेत हे विधिमंडळ अधिवेशनात मी पटलावर ठेवील, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली.