सर्वेक्षणासाठी आशा स्वयंसेविकांना फक्त २० रुपये मानधन !
By गणेश हुड | Updated: May 17, 2024 15:16 IST2024-05-17T15:16:02+5:302024-05-17T15:16:31+5:30
Nagpur : आरोग्य विभागाचे मानधन वाढीसाठी उपसंचालकांना पत्र

Only 20 rupees honorarium for Asha volunteers for the survey!
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :नागपूर शहर परिसरातील विविध नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांत कार्यरत असलेल्या परिचारिका व आशा स्वयंसेविका यांच्या माध्यमातून सर्वेक्षण केले जात आहे. यासाठी आशा स्वयंसेविकांना दर दिवसाला २० रुपये मानधन मिळत आहे. ही रक्कम नगन्य नसल्याने ३०० रुपये मानधन देण्याची मागणी मनपा अस्थायी आरोग्य कर्मचारी संघटनेने केली होती. त्यानुसार मनपाच्या आरोग्य विभागाने मानधन वाढीसाठी आरोग्य सेवा सहसंचालक (क्षयरोग) पुणे यांना पत्र पाठवले आहे.
सर्वेसाठी आशांना दिवसाला २० रुपये मानधन मिळत आहे. दिवसाला अंदाजे ३० घरांचे सर्वेक्षण केले तर एका घरासाठी ६५ पैसे आशाला मिळतात. सातव्या वेतन आयोगाच्या काळात दिवसाला २० रुपये मानधन ही कल्पनाही करता येत नाही. त्यामुळे किमान ३०० रुपये मानधन देण्यात यावे. तसेच मे महिन्यात कडक ऊन असल्याने सर्वेक्षण एक महिना लांबणीवर टाकण्यात यावे, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष जम्मू आनंद यांनी केली होती. त्यानुसार महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलेकर यांनी संघटनेच्या आशा वर्कर यांची बैठक घेतली. पाचपावली केंद्रातील आशा कर्मचाऱ्यांना उन्हात सर्वे केल्याने चक्कर येवून डोके दुखी व उलट्या होत असल्याचे कर्मचाऱ्यांनी निदर्शनास आणले. यावर आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेतली. मानधन वाढीचा व सर्वेक्षण पुढे ढकलण्याबाबत निर्णय घेणे शासनाच्या अधिकारात असल्याने याबाबत डॉ. दीपक सेलोकर यांनी आरोग्य उपसंचालकांना पत्र पाठवल्याची माहिती जम्मू आनंद यांनी दिली. यावेळी जम्मू आनंद यांच्यासह रेश्मा अडागळे, इंदिरा गोटाफोडे, ज्योती कावरे, भाग्यश्री फुलबांडे, सुधा केळकर, देविना रेंडके, अश्विनी सोनवणे, पूनम फुलझाळे, भारती वर्मा, सारिका अवधूत, यमुना टेकम, संगीता टेकाम व मोठ्या संख्येने आशा वर्कर्स उपस्थित होत्या.