उपराजधानीत कांद्यात घसरण, लसूण मात्र आवाक्याबाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 10:25 IST2020-02-10T10:24:30+5:302020-02-10T10:25:48+5:30
देशाच्या सर्वच राज्यातील कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात बाजारात आल्यानंतर जानेवारीमध्ये वाढलेल्या भावात फेब्रुवारीत मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे.

उपराजधानीत कांद्यात घसरण, लसूण मात्र आवाक्याबाहेर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशाच्या सर्वच राज्यातील कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात बाजारात आल्यानंतर जानेवारीमध्ये वाढलेल्या भावात फेब्रुवारीत मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. किरकोळमध्ये चांगल्या प्रतीच्या कांद्याचे भाव ३५ ते ४० रुपये आहेत. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. मार्चनंतर उन्हाळी कांदा निघाल्यानंतर भाव आणखी कमी होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. निर्यात बंदी आणि आयात वाढल्याने भाववाढीवर नियंत्रण आल्याचे व्यापारी म्हणाले.
पीकवाढीचा कृषितज्ज्ञांचा अंदाज
कळमन्यात प्रती किलो ६० ते ७० रुपयांपर्यंत पोहोचलेले भाव आवक वाढल्याने बरेच कमी झाले आहेत. कळमना आलू-कांदे बाजारात उत्तम दर्जाचे कांदे २० ते २२ रुपये, मध्यम १३ ते १७ आणि हलक्या दर्जाचे भाव ५ ते १० रुपये आहेत. मार्चनंतर उन्हाळी कांदा बाजारात आल्यानंतर भाव पुन्हा कमी होतील. कळमन्यात आठवड्यात सरासरी २० ते २२ ट्रकची आवक आहे. सध्या जळगाव, नाशिक, अहमदनगर येथून लाल कांदे तर गुजरात (भावनगर) येथून पांढरे कांदे येत आहे. लाल कांदे २० ते २२ आणि पांढरे कांद्याचे १५ ते २० रुपये भाव आहेत. विदर्भात अकोला व अमरावती येथून पांढरे आणि बुलडाणा येथून लाल कांदे मार्चच्या अखेरीस येण्याचा अंदाज कळमना येथील आलू-कांदे अडतिया असोसिएशनचे माजी अध्यक्ष जयप्रकाश वसानी यांनी लोकमतकडे व्यक्त केला. यावर्षी कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता कृषितज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. काही महिन्यांपूर्वी कांद्याला जास्त भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी उन्हाळी कांद्याची जास्त लागवड केली. परिणामी काही दिवसांपूर्वी आलेल्या पावसामुळे चांगले पीक येण्याचा अंदाज आहे.
वसानी म्हणाले, उत्तर प्रदेशात मुसळधार पावसामुळे बटाट्यांचे पीक खराब झाले. त्यामुळे मध्यंतरी आवक कमी झाली, शिवाय जुन्या बटाट्यांचा स्टॉक संपल्याने टंचाई झाली, परिणामी भाव अचानक वाढले होते. यावर्षी मुबलक पीक येण्याचा अंदाज आहे. पुढे भाव कमी होतील. कळमन्यात आठवड्यात सरासरी २० ट्रक बटाटे येत आहेत.
पीक खराब झाल्यानेच लसणाचे भाव वाढले
यावर्षी मुसळधार पावसामुळे लसणाचे पीक खराब झाल्यामुळे भाव आकाशाला भिडले आहेत. गेल्यावर्षी ठोक बाजारात ६० ते ७० रुपये भाव होते. यावर्षी टंचाईमुळे १५० ते २०० रुपयांवर पोहोचले आहेत. यावर्षी लसूण उशिराच बाजारात आला. जुन्या मालाची टंचाई असल्याचा परिणाम भाववाढीवर झाला. सध्या १५ ते २० टक्के नवीन माल आणि जवळपास ८० टक्के जुना माल येत आहे. मध्य प्रदेशातील रतलाम, जावरा, मनसोर, छिंदवाडा येथून आवक आहे. राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक राज्यातील नवीन मालाची आवक सुरू झाल्यानंतर भाव कमी होण्याची शक्यत आहे. याकरिता पुन्हा महिनाभर वाट पाहावी लागेल, असे वसानी यांनी स्पष्ट केले.
बटाट्यांची आवक वाढली, भाव आटोक्यात
कळमन्यात दोन आठवड्यांपासून उत्तर प्रदेशातील कानपूर, अलाहाबाद, सिरसागंज, इटावा आणि मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथून बटाट्यांची आवक वाढल्याने भाव नियंत्रणात आहेत. चांगले बटाटे १५ ते २० आणि हलक्या दर्जाचे भाव १० ते १३ रुपये आहेत. किरकोळमध्ये ३० रुपये प्रति किलो भाव आहेत.